डोंबिवली शहराच्या अस्तित्वाला अनेक पदर आहेत. हे शहर मराठमोळी संस्कृती जपणारे आहे. नोकरदार नवरा-बायकोसाठी सुरक्षेची हमी देणारे आणि विकसित शहर म्हणून उदयास येत आहे. संस्कृती जपता जपता आधुनिकतेची कास धरून विकासाचे शिखर पार करण्यासाठी डोंबिवलीकर आज तयार आहे. त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर इच्छाशक्तीच्या जोरावर विकास साधण्याची अपेक्षा शहरवासीय करीत आहेत, पण या शहराच्या फुग्यात वारेमाप लोकसंख्या आणि असुविधांच्या रुपाने हवा भरली जात आहे. नियोजित शहराची अपेक्षा बाळगून असलेल्या आद्य डोंबिवलीकरांच्या सहनशक्तीचा कडेलोट होत आहे. रस्ते, पाणी, वाहतूक, वीज आणि शहराचा उभा-आडवा विकास योग्य रीतीने व्हावा अशीच अपेक्षा मान्यवरांकडून ‘लोकसत्ता ठाणे’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. त्याविषयी..

आक्रसलेल्या डोंबिवलीची विकासाकडे वाटचाल
56आबासाहेब पटवारी
डोंबिवली शहरावर नगरपालिका राजवटीपासून अन्याय होत आला आहे. शासनाकडून या शहराला विकासकामांसाठी जेवढा निधी मिळणे आवश्यक होता तो कधीच मिळाला नाही. नोकरी, व्यवसायात व्यस्त असलेला येथील रहिवासी सोशीकपणाने हा अन्याय सहन करीत राहिला. आता स्थानिक पातळीवर, राज्यात एकच सत्ता आहे. शासनाकडून नवीन विकासाकामांच्या घोषणा होत आहेत, त्यामुळे डोंबिवली शहराचा लवकरच कायापालट होईल.
येत्या चार वर्षांच्या काळात कल्याण टर्मिनल, ठाणे-डोंबिवली समांतर रस्ता, माणकोली उड्डाणपूल हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागतील. हे रस्ते, रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू प्रयत्नशील आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या पर्यावरणाच्या परवानग्या येत्या दीड वर्षांत मिळतील असा विश्वास आहे. ही विकासकामे थंडावली तर सरकारला हलवण्यासाठी प्रसंगी चळवळ उभी करू. केंद्र, राज्यात एकच सरकार असल्याने विकासकामे मार्गी लागण्यात अडचणी येणार नाहीत. विकासकामांचे विषय मंजूर झाले आहेत. ते मार्गी लावण्यासाठी जागरूक वर्तमानपत्रांनीही पुढाकार घेऊन मंत्रिमंडळापर्यंत हे विषय पोहोचवावेत. म्हणजे विकासाचे हे विषय सर्व रेटय़ातून पुढे जातील. नागरिकांच्या मतांना ठळक स्थान देत आहेत. नागरिकांनी अशा माध्यमातून आपली मते व्यक्त केली तर रखडलेल्या प्रकल्पांकडे शासनाचे लक्ष वेधणे अधिक शक्य होईल. यापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत शं. ना. नवरे डोंबिवली ते मुंबई नोकरीनिमित्त प्रवास करायचे. विविध प्रवासी गट त्यांच्या संपर्कात येण्यासाठी धडपड करायचा. विविध प्रकारची चर्चा या प्रवासात व्हायची. मंत्रालयात या चर्चेच्या निमित्ताने नागरी समस्यांचे विषय पोहोचले जायचे. काही प्रश्नांची तड या माध्यमातून लागायची. आताचे नगरसेवक जागरूक आहेत.

 सापत्न वागणूक
– डोंबिवली नगरपालिका काळापासून पालिकेला तत्कालीन शासनाकडून नेहमी सापत्न वागणूक देण्यात आली. अनेक टक्केटोणपे या शहराने सहन केले आहेत. ही नगरपालिका का बरखास्त करू नये, अशी भीती तत्कालीन शासनाकडून नगरपालिका प्रशासनाला नेहमी दाखवली जायची. प्रत्यक्षात कृती मात्र केली जात नसे, ही वस्तुस्थिती आहे.

– फेरीवाल्यांनाही पोट आहे.
– डोंबिवलीतील महिला सक्षमीकरण प्रभावी आहे. रस्ते, पदपथांवरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. पोलिस, पालिका कर्मचाऱ्यांनी अशा महिलांना सहकार्य केले तर फेरीवाले पदपथावरून हटवणे अवघड नाही. पोलिस आणि पालिकांनी हा विषय मनावर मनावर घेणे आवश्यक आहे. मात्र, शेवटी फेरीवाल्यांना पोट आहे. उपजीविकेसाठी ते रस्त्यावर बसणारच. त्यांना शिस्त लावून हा विषय सोडवला पाहिजे.

58रस्ते खोदण्याचे डोंबिवलीला व्यसन
तेजश्री प्रधान
– डोंबिवली हे खरं तर मनात वसलेलं शहर. पण या शहराला अलीकडे रस्ते खोदण्याचे व्यसनच जडले आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत ती वेळेवर का पूर्ण होत नाहीत हेदेखील न उलगडणारे कोडे आहे. मुंबईहून डोंबिवलीला रस्त्याने जाता येते याची अजूनही कल्पना अनेकांना नाही इतके या सगळ्या परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे. मुंबई, ठाण्याला समांतर रस्ता बांधला जाईल हे मी कित्येक वर्षे ऐकते आहे. आता हे सगळे सहन करण्यापलीकडे असले तरी सहन करण्याशिवाय डोंबिवलीकर दुसरे काय करू शकतो, असे विचारावेसे वाटते.
– आपले मूल जसे शहाणे, हुशार असते तशा त्याच्या काही खोडय़ाही असतात. डोंबिवलीचेही तसेच आहे. वर्षांचे बाराही महिने येथील रस्ते खोदून ठेवलेले असतात. डोंबिवलीचे पालक बनून याला आपण प्रतिबंध केला पाहिजे. येथील समस्या सोडविण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकत्र यायला हवे. येथील गैरसोयींकडे दुर्लक्ष करण्याचे आपल्याला लागलेले व्यसन सोडले पाहिजे. बारकाईने विचार केला तर आशावादी राहण्यापलीकडे डोंबिवलीकर दुसरे काय करू शकतात हा मोठा सवाल आहे. पर्याय नाही म्हणून त्यांनी केवळ आशावादी राहायचे, असा याचा अर्थ नाही.शक्य आहे, तेथे प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही.
– डोंबिवलीकरांची कायम खिल्ली उडवली जाते. डोंबिवलीला जायचे तर व्हिसा काढलास का असा खोचक प्रश्न नेहमी केला जातो. कारण अनेकांना माहितीच नाही की येथे जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय सोडून इतर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांना नेहमी आम्हाला कोठून कसे जा असे सांगावे लागते. हे आपले दुर्दैवच आहे. येथील रस्ते आणि त्यावरील खड्डे यातून गाडी चालविणे म्हणजे एक दिव्य आहे. या प्रवासाला कंटाळल्यामुळेच अनेकजण नंतर डोंबिवली सोडून दुसरीकडे राहण्यास जाण्याचा विचार करतात.

भावनेचा ओलावा अजूनही कायम
– डोंबिवलीतील आपलेपणा, भावनांचा ओलावा या गोष्टींची गोरेगावला राहताना नक्कीच उणीव भासते. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये शेजारधर्म राहिलेला नाही. डोंबिवलीत राहताना आई- वडील जेव्हा नोकरी करायला जात असत, तेव्हा घरात एकटे राहताना असुरक्षिततेची भावना कधी मनात आली नाही. येथील नोकरदार निर्धास्तपणे मुलांना एकटे घरात ठेवून जातात. आपलेपणा आणि भावनांचा ओलावा अजूनही येथे कायम आहे. कामासाठी मी बाहेर असले तरी डोंबिवलीच्या ओढीने येथे कायम येत असते.

55‘तिसरी मुंबई’ हाच आशेचा किरण
माधव जोशी
– कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील सत्तावीस गाव, मुंब्रा भागाचा शासनाने स्वतंत्र पालिका म्हणून विचार केला. या भागात रस्ते, उड्डाण पूल, वाहतुकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून दिले, तर ‘तिसरी मुंबई’ म्हणून हा भाग नव्या जोमाने विकसित होईल आणि डोंबिवलीचे गुदमरलेपण काही प्रमाणात कमी होईल. या नव्या पालिकांची अपेक्षा आताच्या सरकारकडून करण्यास काहीच हरकत नाही.
– कल्याण-डोंबिवली परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. या भागात रस्ते आहे तेवढेच आणि वाहने दसपटीने वाढली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या या भागाला तीव्रतेने जाणवत आहे. डोंबिवली परिसरात कचरा टाकण्यासाठी कोठे जागा नाही. डोंबिवली शहर परिसराची लोकसंख्या वाढतेय, त्या प्रमाणात रस्ते, पदपथ, उड्डाण पूल या अत्यावश्यक नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याने डोंबिवली परिसर गुदमरल्यासारखा वाटतो. हे चित्र अजून काही काळ राहल. नवीन शासन या भागात नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र, राज्य सरकार समन्वयाने काम करीत असल्याने विकासाचे सकारात्मक चित्र डोंबिवली परिसरात दिसेल असा विश्वास आहे.

– गावकीचा ओलावा
– डोंबिवली बकाल वगैरे म्हटले जात असले तरी एवढे चित्र वाईट नाही. शहरातील २३ संस्था दरवर्षी एकत्र येऊन उल्लेखनीय काम केलेल्या नागरिकांचा सन्मान करतात. हॉटेल व्यावसायिक किट्टा शेट, संघाचे कोकण प्रांत प्रमुख बापूसाहेब मोकाशी, कुळकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुळकर्णी, उद्योजक शंकरकाका भोईर यांचे सन्मान करण्यात आले.

– धडाकेबाज अधिकारी हवा
– ठाण्यात आयुक्त असताना टी. चंद्रशेखर यांनी शहर विकासासाठी अनेक धडाकेबाज कामे केली. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अशा धडाकेबाजपणामुळेही शहराचा विकास होतो. म्हणून ठाण्यात रुंद रस्ते, बागा, तळी विकसित झाली आहेत. कल्याण-डोंबिवलीतही राजकीय शक्ती अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभारली पाहिजे.

सोशिक डोंबिवलीकर
– कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या १२ लाख आहे. नागरीकरण झपाटय़ाने होत आहे. शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा मोठी संकुले उभी राहत आहेत. नागरिकांची गरज ओळखून ती थांबवणे शक्य नाही. मागील दीड वर्षांत मानपाडा रस्ता पाहिला तर रस्ता तेवढाच, पण वाहने दुपटीने वाढली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी येथील नागरिकांची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून मानपाडा रस्त्यावर आता उन्नत (इलेव्हेटेड) रस्ता उभारणे आवश्यक आहे. या भागातील नागरिकांचे मुंबई हे नोकरी, व्यवसायाचे साधन आहे. नोकरीसाठी मी डोंबिवलीपासून मुंबईत एक्स्प्रेस टॉवपर्यंत दर महिन्याला तीन हजारांप्रमाणे आतापर्यंत सात लाख किमीपर्यंत प्रवास केला आहे. डोंबिवलीकर खूप सोशिक आहे. रस्ते, खड्डे व इतर काही नागरी समस्या असल्या तरी तो ते मुकाटय़ाने सहन करतो. व्यवस्थेविषयी त्याच्या मनात संताप असतो. हा संताप जिरवण्यासाठी नाटक, सिनेमे पाहून तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो.

57डोंबिवलीचा गळा घोटला जातोय
वसंत आजगावकर
– डोंबिवली शहर हे मुळात नोकरदारांची वस्ती. ५० वर्षांपूर्वीदेखील येथे नोकरीपेशा करणारे लोकच जास्त होते. कालांतराने येथे औद्योगिक वस्ती उभी राहिली, मात्र तरीही मुंबईला नोकरीसाठी जाणारी लोक येथे जास्त आहेत. साहित्याची आवड असणारी लोक येथे पूर्वी वास्तव्यास होती आणि त्यांच्या सहवासामुळे या शहराला एक सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. त्यांचा सहवास आणि त्यातून निर्माण झालेली माणसे यामुळे हे शहर सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असले तरी येथील गैरसोयीचे जगणे तितकेच त्रासदायक आहे.
– डोंबिवलीत राहणे नको असे कधी वाटले नाही, मात्र इथे राहणे फार गैरसोयीचे होते एवढे मात्र नक्की. येथील प्रत्येकालाच काही ना काही कारणास्तव मुंबईला प्रवास करावा लागतो आणि रेल्वेतील डोंबिवली ते मुंबई हा दीड तासांचा प्रवास म्हणजे फार जिकिरीचा भाग असल्याने अनेकजण तसा विचारही करत असतील. नागरिकांचा अर्धाअधिक वेळ प्रवासातच जात असतो. डोंबिवलीत चहूबाजूंनी वाढते आहे. ही वाढ शहराची की केवळ लोकांची याचा विचार झाला पाहिजे. मुंबईमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या प्रत्येक माणसापुढे राहायचे कोठे हा प्रश्न आहे. त्यामुळे तो आजूबाजूला राहायची सोय पाहतो. त्यातील काहींना डोंबिवली सोयीचे वाटल्याने ते इथे आले. दिवा येथेही आता इमारती उभ्या राहात असून तेथेही लोकवस्ती वाढत आहे.
– जोपर्यंत या गावांचे विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत हे असेच सुरू राहणार आहे. या गावांचे नियोजन आवश्यक आहे. डोंबिवली जेव्हा खेडे होते तेव्हा येथे राहणे आनंददायक वाटत होते. आता येथे वाहनांची, माणसांची, फेरीवाल्यांची गर्दी वाढत असल्याने डोंबिवलीचा गळा घोटतोय असे वाटते.

डोंबिवली ते मुंबई प्रवास सुखकर व्हावा
– ठाणे-डोंबिवली समांतर रस्ता व्हायला हवा, पण तो होत नाही. त्याविषयी केवळ बोलले जाते, होत मात्र काहीच नाही. ठाणे-डोंबिवली समांतर रस्ता झाल्यास डोंबिवली ते मुंबई असा जिकिरीचा प्रवास सुखकर होईल. अवघ्या पंधरा मिनिटांत हे अंतर पार होईल, मात्र शासनकर्त्यांना त्याचे काही पडलेले नाही. जो तो आपआपल्या पद्धतीने आपल्या कक्षेभोवतीचे कोंदण पार करण्याचा केवळ प्रयत्न करतो आहे.

– मर्यादांचा कडेलोट होतोय
– एखाद्या शहराची वाढ कितपत होऊ द्यायची, त्याला काही मर्यादा असतात. या मर्यादांचा कडेलोट येथे पाहायला मिळतो. येथील शासनकर्त्यांनी या वाढलेल्या लोकसंख्येचा कारभार आपल्याला पाहता येणार आहे का याचा विचार केला आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे जुन्या डोंबिवलीपलीकडे एक नवी डोंबिवली विकसित करण्याची वेळ आली आहे.

51आशावादावर किती जगायचे, हा संपादक गिरीश कुबेर यांनी उपस्थित केलेला प्रश्न खूप महत्त्वाचा होता. आतापर्यंत आशावादावर डोंबिवलीकर जगले. सहनशक्ती संपली आहे. कोणी काहीही करीत नाही, म्हणून डोंबिवलीतील सामान्य, मध्यमवर्गीय माणसाने नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. – महेश वैद्य

‘लोकांना वाटणे’ आणि ‘स्वयंशिस्त’ जोपर्यंत शहरातील नागरिकांमध्ये येत नाहीत तोपर्यंत कितीही चर्चा, आंदोलने केली तरी नागरी विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत. फेरीवाल्यांकडून नागरिकांनी खरेदी केली नाही तर ते रस्त्यावर कशाला बसतील. दुकाने गुंडाळून निघून जातील. घराच्या भोवतीचा कचरा आपण स्वत:हून साफ केला. रस्त्यावरच्या केळ्याचे सालपट, चॉकलेटचे वेष्टन कचराकुंडीत टाकण्याची सवय लावून घेतली तर स्वच्छता विषय येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झाडू हातात घेतला तेव्हा आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व कळले. हे न सांगण्यासारखे विषय जोपर्यंत नागरिक स्वत:ला पटवून सांगत नाहीत तोपर्यंत वर्षांनुवर्षांचे हे विषय पुढे चालत राहणार आहेत.
– सुधीर भागवत

डोंबिवलीने देशाला नाही जगाला खूप काही दिले आहे. डोंबिवलीकर माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. चांगली कामे करीत आहे. संस्थारूपाने चांगली कामे उभी राहिली आहेत. रस्ते, खड्डे हे नागरी समस्या म्हणून ठीक. पण चर्चेचा विषय फक्त त्याभोवती फिरत राहिला. डोंबिवली इतकी वाईट नाही की त्यावर शिंतोडे उडावे. चांगले विषयही पुढे येणे आवश्यक होते. – दीपाली काळे

कल्याण-डोंबिवलीत नगरपालिका राजवटीपासून या क्षणापर्यंत भाजप, काँग्रेसची राजवट होती. त्यामुळे हे दोन्ही पक्ष शहरांच्या बकालपणाला सर्वाधिक जबाबदार आहेत. या चर्चासत्राच्या निमित्ताने डोंबिवलीतील विकासकामांची करण्यात आलेली शस्त्रक्रिया महत्त्वाची वाटली. डोंबिवलीत उच्चशिक्षित मध्यमवर्ग मी, माझा यापुरताच सीमित आहे. नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी तो अजिबात रस्त्यावर उतरत नाही. – लता अरगडे

‘धर्माचा लढा जेव्हा अधर्माशी असतो, तेव्हा धर्म जिंकतो. धर्माचा लढा जेव्हा राजसत्तेशी असतो, तेव्हा धर्माचे काही चालत नाही’ असे मेधा पाटकर म्हणाल्या होत्या. म्हणजे येथल्या सत्ताधीशांच्या मनात जेव्हा जनतेला काही द्यायचे असेल तरच ते जनतेला मिळेल, अन्यथा नाही. नोकरदारवर्ग सार्वजनिक हितासाठी रस्त्यावर उतरणार नाही.
अलका मुतालिक

‘एमएमआरडीए’च्या एकूण अर्थसंकल्पाच्या दहा टक्केपण खर्च ठाणे, रायगडच्या प्रदेशात झाला नाही. त्यामुळे विकासकामांची मोठी घळी या भागात तयार झाली आहे. रस्ते, उड्डाण पूल हे विषय पालिकेचे नाहीत. यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते. त्याचे चटके आता पालिकांना बसत आहेत.
– राहुल दामले, उपमहापौर, केडीएमसी

– मी डोंबिवलीकर म्हणून आपण अभिमानाने मिरवतो. आपण मोठे झालो की बाहेरच्या शहरात राहायला जाऊन तेथून मी डोंबिवलीकर म्हणून बोलायला सुरुवात करतो. फक्त बाता मारल्या जातात. प्रत्यक्ष कृती शून्य. त्यामुळे डोंबिवली बकाल झाली आहे. साधे पदपथ, रस्ते चालायला नाहीत. त्या शहरातून कोणी कोणता आदर्श घ्यायचा. आम्ही डोंबिवलीकर म्हणवणाऱ्यांनी नियमित रस्त्यावर उतरून विकासाच्या विषयावर बोलायला पाहिजे.
– मनीषा आचरेकर

एक गावाच्या विकासाची कल्पना समोर ठेवून आयोजित केलेला कार्यक्रम महत्त्वाचा वाटला. काही विषयांतर झाले, पण आशावादावरील चर्चा खूप काही सांगून गेली. विकासाची वाट या निमित्ताने दिसली.
विश्राम परांजपे