सांगलीतील महावीर स्वामी मंदिरात झालेली साडेपाच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणून मंदिराच्या पुजाऱ्यासह तिघांना गजाआड केले आहे. पुजाऱ्याने लग्नासाठी ही चोरी दोन मित्रांच्या मदतीने करून दरोडय़ाचा बनाव केला असल्याचे अधीक्षक दिलीप सावंत यांनी सोमवारी सांगितले.
सांगलीतील त्रिकोणी बागेजवळ असणाऱ्या महावीर स्वामी मंदिरात चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने देवदर्शनास आलेल्या लोकांनी पाठीमागील दुसऱ्या इमारतीवरून आत प्रवेश केला असता मंदिराचा पुजारी विजय अण्णाप्पा कुंभार हा हातपाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यामध्ये बंदिस्त अवस्थेत असल्याचे आढळून आले होते.
पुजाऱ्याने चौघा चोरटय़ांनी मारहाण करून जबरदस्तीने मंदिराचे कुलूप उघडण्यास भाग पाडले व मंदिरातील सीसीटीव्हीचे कॅमेरे फोडून महावीर स्वामींच्या अंगावरील सोन्याचे दागिने, चांदीचे छत्र, दान पेटीतील रोख रक्कम काढून घेतली. चोरटय़ांनी खालील बाजूस आणून मारहाण करून डोळय़ांत चटणी टाकून पलायन केले असल्याची बतावणी या पुजाऱ्याने केली होती. याबाबत मंदिराच्या विश्वस्तांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली होती.
पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर पुजाऱ्यावर संशय बळावल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघा मित्रांच्या साहाय्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे साथीदार मिरासाहेब हुसेनसाहेब करजगी व सतीश रामगोंडा उमराणीकर या दोघांना ताब्यात घेताच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. मिरासाहेब करजगी याने मंदिरातून चोरलेले दागिने बहिरवाडगी (जि. विजापूर) येथे ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी हे सर्व दागिने जप्त केले आहेत. मंदिरातील साडेपंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाचा चांदीचा मुकुट छत्र व दानपेटीतील रोकड असा ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पुजारी विजय कुंभार हा हातकणंगले तालुक्यातील असून, मंदिराच्या विश्वस्तांनी मासिक पाच हजार रुपये पगारावर त्याची नियुक्ती केली होती. १ डिसेंबरपासून त्याला कार्यमुक्त करण्यात येणार होते. तत्पूर्वीच त्याने चोरी करून डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. विजय कुंभार हा वाणिज्य शाखेचा पदवीधर असून एमपीएससीची परीक्षाही त्याने दिली आहे. यापूर्वी त्याने कोल्हापुरात शाहूपुरीत शांतिलाल भगवानला मंदिरात चोरी करून ७० हजारांची लूट केली होती. ही चोरी उघडकीस येताच मंदिराच्या विश्वस्तांनी माफीनामा लिहून त्याची हकालपट्टी केली होती. मामाच्या मुलीशी तो त्या वेळी लग्न करणार होता. या वेळीही त्याने एका मुलीशी सूत जुळविले होते. तिच्याशी तो विवाहबद्ध होणार होता. त्यामुळेच त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला असल्याचे अधीक्षक सावंत यांनी सांगितले. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान उपस्थित होते.