सकाळी सात ते अकरा या चार तासांच्या वेळेत डोंबिवलीहून मुंबईला जाणाऱ्या डोंबिवली लोकलला महिला व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र अतिरिक्त प्रथम श्रेणीचे डबे ठेवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. गेली अनेक र्व्ष ही मागणी आम्ही मध्य रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे करीत आहोत, पण त्याची दखल घेण्यात येत नाही अशी खंत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवलीहून सकाळी आठ ते सकाळी अकरा या दरम्यान मुंबईला लोकलने जायचे असेल तर भल्या भल्या प्रवाशांची तेथील गर्दीमुळे त्रेधातिरपीट उडते. निवृत्तीकडे झुकलेले अनेक प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, काही आजारी असलेले नागरिक या गर्दीवर पर्याय म्हणून डोंबिवली लोकलने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात.
अनेक नागरिक प्रथम श्रेणीचा पास काढून किमान आरामात उभे राहून जाऊ अशी अपेक्षा करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली लोकलमधील प्रथम श्रेणीचे डबे लोकल स्थानकात येताच प्रवाशांनी तुडुंब भरून जातात. परिणामी रेटारेटी, श्वास रोखतच अनेकांना प्रवास करावा लागतो. प्रथम श्रेणी डब्यातून किमान उभे राहून जाऊ ही अनेक प्रवाशांची अपेक्षा फोल ठरते.
डोंबिवली लोकलच्या सीएसटी व कल्याण बाजूला प्रत्येकी एक प्रथम श्रेणीचा डबा आहे. या दोन्ही डब्यांमधील अर्धा डबा महिला व अर्धा डबा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दोन्ही बाजूंकडील पुरुषांच्या प्रथम श्रेणी डब्यातून खच्चून शंभर ते दोनशे प्रवासी प्रवास करतात. असाच प्रथम श्रेणी डब्यातील प्रवास महिला कोंडमारा सहन करीत करतात.
डोंबिवली लोकलला एक स्वतंत्र प्रथम श्रेणीचा डबा पुरुषांसाठी व एक महिलांसाठी ठेवला तर उडणारी झुंबड, प्रवाशांचे विशेषकरून ज्येष्ठांचे होणारे हाल कमी होतील, अशी अपेक्षा प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
 खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक दिवस डोंबिवली लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील सकाळचा अनुभव अनुभवावा आणि स्वतंत्र प्रथम श्रेणी डबे देण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.