यंदा पाऊस अवर्षणामुळे बुलढाणा जिल्ह्य़ात खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका आदि पिकांचा पेरा अत्यल्प झाल्याने जिल्हाभर चारा टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ते दूर करण्यासाठी, तसेच गुरांच्या छावण्या व चारा डेपो उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग अपयशी ठरू लागले आहे. परिणामत: शेतकऱ्यांवर आपली गुरेढोरे मातीमोल भावात कसायांना विकण्याची पाळी आली आहे.
जिल्हाभर दुष्काळ, पाणीटंचाई व चारा टंचाईने कहर केला आहे. यंदा पाऊस अवर्षणामुळे ज्वारी पिकाचा पेरा नसल्यागतच आहे. अत्यल्प प्रमाणात मका व बाजरीची पेरणी करण्यात आली. परिणामत: ही तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून, तो प्रती शेकडा २२०० ते २५०० पर्यंत पोहोचला आहे. एवढय़ा महागडय़ा भावात चारा खरेदी करणे शेतकऱ्यांना अशक्य आहे. कडबा, गवत व बाजरीचे सरमड उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन व तुरीच्या कुटारावर अवलंबून रहावे लागत आहे. या कुटाराचाही भाव बराच वाढला आहे. गुराढोरांच्या आबाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गुराढोरांना कसे पोसायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मौल्यवान गुरेढोरे मातीमोल भावात बाजारमार्गे कसायांच्या दाराकडे वळू लागले आहे. या एकूणच भयावह परिस्थितीची कुठलीही दखल जिल्हा प्रशासन व राज्य सरकारने घेतली नाही. जिल्ह्य़ात अजूनही क ोठे चारा डेपो व गुरांच्या छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासन पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बुलढाणा जिल्ह्य़ातील दुष्काळाला कुठल्याही सोयी सवलती देण्यास तयार नाही. त्यामुळे गुरांच्या छावण्या व चारा डेपो सुरू होतील की नाही, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.  या पाश्र्वभूमीवर दुष्काळाचा वस्तूनिष्ठ सव्‍‌र्हे करून हे पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या व चारा डेपो त्वरित सुरू करावे, अशी मागणी भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे, शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.