पाऊस गेल्याने मलेरिया, कावीळ, पोटदुखी अशा पावसाळ्यातील साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत असले तरी या काळात डोळ्यांच्या संसर्गाचा धोका अधिक वाढतो. त्याचवेळी ताप, घशाच्या संसर्गाची शक्यताही अधिक आहे. ऐन दिवाळीत विषाणूसंसर्गापासून वाचण्यासाठी सकस आहार व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वातावरणातील बदल, कोरडी झालेली हवा व वाढलेले तापमान यामुळे या दिवसात विषाणूंची वाढ अधिक प्रमाणात होते. विषाणूसंसर्गामुळे होणारी सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घशाची खवखव असे अनेक आजार होऊ शकतात. विषाणूसंसर्ग थांबवण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे हाच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. सकस आहार तसेच पुरेशी झोप व भरपूर पेय पदार्थ घेतल्याने संसर्गाची शक्यता कमी होते तसेच आजारातून लवकर बरे होता येते, असे फॅमिली डॉक्टर सुहास पिंगळे यांनी सांगितले.
डोळे येण्याचे प्रमाणही याच काळात वाढते. डोळे येत असल्याच्या रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डोळे येणे हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे गर्दीत जाणे टाळा. चष्मा किंवा गॉगल लावून बाहेर पडावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत किंवा औषध दुकानदारांच्या सल्ल्याने औषध घेऊ नका, असे डॉ. पिंगळे म्हणाले.
डोळे येणे म्हणजे नेमके काय?
डोळ्याच्या वरच्या थराला तसेच पापण्यांच्या आतील बाजूस विषाणू संसर्ग होतो. त्यामुळे डोळे लाल होतात, डोळ्याला खाज सुटते व सतत पाणी गळत राहते.
उपाय – अनेकदा एकाच डोळ्याला संसर्ग होतो. मात्र एकच रुमाल, हाताने दुसऱ्या डोळ्यालाही स्पर्श केल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे थंड पाण्याने धुवावेत. डोळ्यांना लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे, वस्तू वापरू नयेत.
सर्दी, ताप, घसा संसर्ग – विषाणूंसोबत लढण्याची शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की हे आजार होतात. अनेकदा डोळे येण्यासोबतच सर्दी, ताप हे आजारही एकत्र येतात.
उपाय – विषाणूसंसर्गामुळे येणारा ताप, सर्दी हे अनेकदा दोन ते तीन दिवसात बरे होतात. मात्र शारीरिक प्रतिकारशक्ती चांगली ठेवायला हवी. नियमित व सकस आहार, पुरेशी विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्या. सर्दी, खोकला, डोकेदुखी यासाठी पाण्याच्या वाफांमुळे आराम पडतो. विषाणू संसर्ग इतरांपर्यंत पोहोचू नये, यासासाठी कपडे वेगळे ठेवा, हात स्वच्छ ठेवा.