हजारोंच्या संख्येने नेत्र प्रत्यारोपणांची गरज असताना केवळ ०.१ किंवा ०.२ टक्के शस्त्रक्रिया करणे उपलब्ध नेत्रदानातून शक्य होते. मात्र, हल्ली नेत्रदान करण्याकडे नागरिकांचा कल हळूहळू वाढत असल्याने अधिकाधिक रुग्णांवर नेत्र प्रत्यारोपण करणे शक्य होत आहे. आपण राहू अथवा न राहू पण डोळ्यांच्या रूपाने इतरांना आनंद देत रहावे, असा एक विचार समोर येतो आहे. नेत्रदान करणाऱ्यांची संख्या वाढावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी केले आहे. विभागात नुकताच नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अष्ठिाता डॉ. राजाराम पोवार होते तर अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यावेळी उपस्थित होते. पंधरवडय़ानिमित्त रुग्णालायला १२ डोळ्यांचे दान मिळाले. त्यातून सहा रुग्णांना नेत्र प्रत्यारोपणाचा फायदा झाला. ज्या रुग्णांना डोळ्यांचा लाभ मिळाला त्यापैकी काहींना संसर्ग झाला होता. काहींच्या डोळ्यात टिक होती तर एकाची दृष्टी अल्सरमुळे बाधित झाली होती. सहापैकी दोन जण जवळजवळ अंध होते.
वर्षभरात डोळ्यांच्या ६९ शस्त्रक्रिया झाल्या. प्रत्येक शस्त्रक्रियेत १० टक्के अपयश ग्राह्य़ धरले जाते. त्याप्रमाणे याही ठिकाणी १० टक्के अपयश ग्राह्य़ धरले तरी ६९ शस्त्रक्रिया पार पडल्या, हेही काही कमी नाही. समाजात पूर्वीपेक्षा नेत्रदानाविषयी जाणीव, जागृती वाढत आहे. लोकांना नेत्रदानासाठी राजी करणे म्हणजे मोठी कसरत करावी लागायची. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या किंवा शवागारातील मृतदेहांवर अवलंबून रहावे लागयाचे. आता लोक स्वत:हून फोन करून नेत्रदानाविषयी सांगतात. भारतात जवळपास ९० लाख मृत्यू दरवर्षी होतात. त्यापैकी केवळ ३० ते ४० हजार नेत्र मिळतात. तेवढय़ाच रुग्णांना प्रत्यारोपणाची गरज पडते. म्हणजे नेत्र प्रत्यारोपणासाठी केवळ ०.१ किंवा ०.२ टक्के नेत्र उपलब्ध होतात. म्हणजे नेत्र प्रत्यारोपणाचा अनुशेष दरवर्षी वाढत जातो. म्हणून अधिकाधिक संख्येने नेत्रदान करण्याची गरज आहे. मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी पाच-सहा लोकांनीच नेत्रदान केले होते. त्यानंतर संख्या वाढत गेली. यावर्षी तब्बल ६९ शस्त्रक्रिया झाल्या. नेत्रदान करण्यासाठी केवळ अर्ज भरून देणे म्हणजे झाले असे नाही. पुष्कळदा मृत व्यक्तीचे नातेवाईक नेत्रदानास तयार नसतात. ऐनवेळी ते नकार देतात. त्यामुळे नेत्रदान करण्यास इच्छुक व्यक्तीने आधी नातेवाईकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. स्वत: डॉक्टर घरी जाऊन डोळे काढतात. मृत्य झाल्यावर सहा तासाच्या आत नेत्रदान आवश्यक असते. घरात एखादा मृत्यू झाल्यास मृतकाचे डोळे बंद करून त्यांच्यावर ओला कापूस ठेवावा. पंखा बंद करावा, अशी माहिती डॉ. मदान यांनी दिली.