गेल्या आठवडाभरात मेडिकल, मेयो आणि डागा या तीनही रुग्णालयात डोळ्यांना संसर्ग झालेले जवळपास ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. नागपुरात अनेक भागात या रोगाने थैमान घातले असून खाजगी रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयातील बाह्य़रुग्ण असलेल्या विभागातही डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अनेक पावसाळी आजारांनीही उपराजधानीला विळखा घातला असून शहरात माजलेल्या अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  
 नागपुरात मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारच्या डोळ्यांच्या आजाराची लागण झाली असून अ‍ॅडिनोव्हायरस या विषाणूमुळे गंभीर आजाराचाही समावेश झाला आहे. हा संसर्गजन्य आजार असून एकाला झालेला आजार दुसऱ्याला होतो असे चित्र सध्या दिसत आहे. या आजाराने शासकीय रुग्णालयातील नेत्रविभागात ५०० रुग्ण आठवडाभरात डोळ्यांच्या उपचारासाठी आले असल्याची माहिती आहे. डोळ्यांचा आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे आरोग्य विभागाला धास्ती बसली आहे.
डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, चिपड येणे, डोळ्यांना खाज सुटणे, सकाळी उठल्यावर डोळे उघडता येत नाही, पापण्यांवर सूज येणे, अंधूक दिसणे, अशी विविध प्रकारची लक्षणे डोळ्यांचा आजार झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. शहरात पावसामुळे होणारा चिखल, अस्वच्छता, घाण, साचलेले दूषित पाणी यामुळे हा आजार वाढत जात असतो. अ‍ॅडिनोव्हायरस हे विषाणू अस्वच्छतेमुळे वाढल्याने हा आजार पसरत आहे. खोकला, स्पर्श अशा विविध कारणांनी हा आजार पसरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलेले जात असून महापालिका पावसाळ्यापूर्वी आणि नंतर योग्यप्रकारे शहरात स्च्छता, साफसफाई करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे. या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यावर काय उपाययोजना करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

असे करावे उपाय
शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी प्रत्येकाने डोळ्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. डोळे आल्यास काळ्या चष्म्याचा उपयोग करावा, किमान ४ ते ५ वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे, डोळ्यात घालण्यात येणारे ड्रॉप्स, मलम वापरताना हात स्वच्छ धुवावे, डोळ्यासाठी वापरलेले रुमाल गरम पाण्यात धुवावे, त्याचप्रमाणे डोळे आलेल्या व्यक्तीचे साहित्य वापरू नये गर्दीच्या ठिकाणी डोळे आलेल्या व्यक्तीने जाऊ नये, रुग्णाने डोळे पूर्ण बरे होईस्तोवर कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा, व्हिटॅमिन युक्त आहार घ्यावा, तसेच औषधोपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी काळजी घेतल्यास यावर या आजारावर नियंत्रण आणता येईल.