दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी लगबग सुरू झाली असून जल प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन अथवा मूर्ती दान करण्यास गणेशभक्तांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेसह विविध संस्था व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून १७० पोलीस अधिकारी आणि १६०० कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तसेच सुमारे ६०० गृहरक्षक आणि महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील २५ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची मदत घेतली जाणार आहे. ठिकठिकाणी बसविलेल्या २७ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. गोदावरी नदीतील संभाव्य प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्था पुढे आल्या असून गणेशभक्तांनी मूर्ती दान कराव्यात, याकरिता पर्यावरणप्रेमी संस्था व संघटनांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या वर्षी संकलीत केल्या जाणाऱ्या मूर्तीचा आकडा दोन लाखापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे. महापालिकेने गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी खास व्यवस्था केली आहे.
वाकडी बारव येथे दुपारी दोन वाजता महापालिकेच्या गणपतीची आरती महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते झाल्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. रात्री बारापर्यंत वाद्ये वाजविण्यास परवानगी असल्याने मिरवणुकीचे शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
काही गणेशोत्सव मंडळे एकाच ठिकाणी बराच वेळ रेंगाळतात. परिणामी, संपूर्ण मिरवणूकच विस्कळित होते. दोन मंडळांमध्ये ३०० ते ४०० फुटापर्यंत अंतर पडत असल्याने पोलिसांवरही ताण येतो. असे अंतर पडू नये याकरिता यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. काही वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी होत आहे. त्याचे कारण रेंगाळणारी मिरवणूक हेच आहे.
मुख्य मिरवणूक मार्गासोबत संपूर्ण शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, १२ सहाय्यक आयुक्त आणि इतर असे एकूण १७० अधिकारी, १७०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. गृहरक्षक दलाचे ५०० जवान, १०० महिला, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती उपायुक्त (प्रशासन) संदीप दिवाण यांनी दिली. या शिवाय चार दंगा नियंत्रक पथक परिस्थितीवर नजर ठेवतील.
दरम्यान, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली वाहण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ शकते. काही हिंदुत्ववादी संघटना वाहत्या पाण्यात मूर्ती दान करण्याचा आग्रह धरतात. परंतु त्यास बळी न पडता भाविकांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. संजय वाघ यांनी केले आहे. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ‘निर्माल्यातून फुलाकडे’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. गंगापूर धबधब्याच्या परिसरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याची विनंतीही केली जाणार आहे. भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात न सोडता त्यापासून सेंद्रिय खत तयार करता येते. त्यातून घरातील बगीचा फुलविता येईल. या उपक्रमास भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.
महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी शहरातील सहाही विभागात २७ ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच मूर्ती आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या मूर्ती महापालिका संकलीत करणार आहे, त्यांचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील मुख्य मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, आनंदवल्ली भागात विसर्जनासाठी त्या त्या परिसरातील वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात पंचवटी डेपो व निमाणी बस स्थानकातून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका चौकातून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस शालीमार येथून सुटतील. याच पद्धतीने नाशिकरोड, आनंदवल्ली या ठिकाणी वाहतुकीवर काही र्निबध घालण्यात आले आहेत.