11 December 2017

News Flash

‘फेस-टू-फेस’ सोशल नेटवर्किंग

एरवी शेजारच्या घरात डोकावण्याइतकाही वेळ न मिळणाऱ्या महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील व्रत ‘फेस-टू-फेस सोशल नेटवर्किंग’

प्रतिनिधी | Updated: December 20, 2012 2:50 AM

एरवी शेजारच्या घरात डोकावण्याइतकाही वेळ न मिळणाऱ्या महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील व्रत ‘फेस-टू-फेस सोशल नेटवर्किंग’ वाढविण्याचे उत्तम साधन ठरते आहे.
पूर्वी चाळी किंवा वाडय़ांमधून दुपारचे आवरले की गप्पाटप्पांसाठी शेजारणीचे घर गाठणे हा नित्यक्रम होता. पण नोकरीधंद्यामुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. नोकरी आणि मुलांचे करण्यातच दिवसातील बहुतांश वेळ जात असल्याने शेजाऱ्यापाजाऱ्यांशी फारशी ओळख वाढविता येत नाही. दूरचित्रवाणीमुळे तर चोवीस तास मनोरंजनाचे साधन घरीच उपलब्ध झाले. त्यामुळे दुपारचे महिलांचे गप्पांचे अड्डे लोप पावत चालले आहेत. तसेही सोसायटय़ांच्या बंद घरांमध्ये हे अड्डे पूर्वीही रंगत नव्हतेच. पण मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी नसले तरी व्रताच्या सांगतेच्या दिवशी तरी शेजारीपाजाऱ्यांकडे जाण्याचे निमित्त महिलांना सापडू लागले आहे.
हे व्रत ठेवणाऱ्या महिलांची संख्या इतकी वाढली आहे की शेवटचा दिवस अनेक महिलांना केवळ शेजारीपाजारी होणाऱ्या हळदीकुंकू समारंभासाठी राखून ठेवावा लागतो. ‘आमच्या व शेजारच्या इमारतींमधून या दिवशी इतकी आमंत्रणे येतात की प्रत्येक ठिकाणी हजेरी लावून घरी येईपर्यंत रात्रीचे अकराही वाजून जातात. पण या निमित्ताने मला खूप नव्या मैत्रिणी मिळाल्या,’ असे दादरमध्ये राहणाऱ्या मंजिरी गोडबोले सांगतात.
वाणाच्या निमित्ताने मिळणाऱ्या लहानमोठय़ा वस्तू, फुला-फळांनी पिशव्या इतक्या भरून जातात की दुसऱ्या दिवशी या बहुतांश महिलांच्या घरात फळांच्या कस्टर्डचा प्लॅन असतो. यातील गमतीचा भाग सोडला तरी ‘मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर यांच्या पलीकडे जाऊन ‘फेस-टू-फेस सोशल नेटवर्किंग’ वाढविण्याचे साधन ठरले आहे,’ असे समुपदेशक शैलजा मुळ्ये यांनाही वाटते.
हिंदू धर्मात वर्षभर विविध व्रतवैकल्ये आणि सणांची चलती असते. दसरा, नवरात्र आदी सण अथवा व्रतांना पुराणकाळापासूनचा आधार आहे. काहींना मात्र तसा पौराणिक आधार सापडत नाही. मार्गशीर्षांतील गुरुवारचे महालक्ष्मी व्रत तसे अलीकडेच प्रचलित झाले आहे. या व्रताला पद्मपुराणाचा आधार असल्याचे सांगितले जाते. पण या व्रताच्या धार्मिक महत्त्वापेक्षाही त्यातील सामाजिक अंग अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात शेजारच्या आणि आसपासच्या इमारतीत राहणाऱ्यांशी फारसा संवाद साधला जात नाही. या पाश्र्वभूमीवर (फक्त) महिलांना एकत्र येण्याची एक चांगली संधी या निमित्ताने मिळू लागली आहे. यानिमित्ताने आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणावर होते. या व्रताचा विविध अंगांनी घेतलेला हा वेध
व्रताची भावना जपा, तुलना टाळा!
व्रतामागील भावना जपणे कसे महत्त्वाचे आहे हे सांगताना शैलजा मुळ्ये महिलांना धोक्याचा इशाराही देतात. ‘व्रतामुळे काही वेळा भेटीगाठींचा अतिरेक होतो. हा अतिरेक महिलांमधील आत्मसंतुष्टतेची सकारात्मक भावना लोप पावण्यास कारणीभूत ठरू शकतो. या निमित्ताने दुसरीकडील साडय़ा, दागिने यांची अनावश्यक तुलना होऊ शकते. म्हणूनच व्रत करताना किंवा दुसरीकडे त्याचे वाण घेण्यासाठी जाताना त्यामागील भक्तीची भावना महिलांनी समजून घेतली पाहिजे,’ असे त्या सुचवितात.

‘प्रमुख धर्मशास्त्रीय ग्रंथांत या व्रताला आधार नाही’
मार्गशीर्ष महिन्यातील ‘महालक्ष्मी व्रत’ या पूजेचा उल्लेख पद्मपुराणात करण्यात आलेला असला तरी अन्य प्रमुख धर्मशास्त्रीय ग्रंथांत या व्रताला कोणताही आधार नाही. हिंदू धर्मातील सण, व्रते या पुस्तकातूनही याचा उल्लेख नाही. त्यामुळे पंचांग किंवा दिनदर्शिकेमध्ये आम्ही या व्रताविषयी काही दिलेले नाही, असे ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
गेल्या काही वर्षांत हे व्रत करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भात सोमण म्हणाले की, समाजात असुरक्षितता वाढली असून प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. कमी श्रमात आणि वेळेत श्रीमंत होण्याकडे कल वाढला आहे. सत्याने आणि न्यायाने वागणाऱ्याला त्रास सहन करावा लागतो. तर भ्रष्टाचारी, असत्याने वागणारे मात्र मजेत असतात, हे चित्र समाजात दिसून येते. सर्वसामान्य माणूस यामुळे चक्रावून जातो. त्यामुळेच सुख, समाधान, शांती आणि ऐश्वर्य मिळविण्याचे व्रतासारखे काही सोपे उपाय असतील तर तो त्याकडे वळतो. मात्र यातून आपण दैववादी आणि देववादी बनत चाललो आहोत.
आपल्याकडील व्रते, पूजा, मंत्रविधी यांत देवाची स्तुती करून मागणे मागितले जाते. पण त्यात ‘मी कसे वागावे’ हे सांगितलेले नाही. खरे तर मी निव्र्यसनी राहीन, खरे बोलेन, लोकांना मदत करेन असे मंत्र आजच्या काळात तयार झाले पाहिजेत. स्वकर्म, स्वधर्म आणि स्वकर्तव्य यांवर आपला विश्वास पाहिजे. धर्मशास्त्रीय ग्रंथांतून या व्रताला आधार नसला तरी या व्रताच्या निमित्ताने लोक सन्मार्गाने वागायला लागले, त्यांच्यात लोकांना मदत करण्याची आणि दान करण्याची वृत्ती वाढीस लागली तर आजच्या काळात ती नक्कीच स्वागतार्ह बाब असल्याचे सोमण यांनी नमूद केले.

First Published on December 20, 2012 2:50 am

Web Title: face to face social networking