विविध संतांनी आपले आयुष्य विठ्ठलभक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी घालविले. यामुळेच काळ बदलला तरी विठ्ठल नामाचा महिमा वाढत आहे. संतांच्या पुढील पिढीनेदेखील हा वारसा घेतला असून बदलत्या काळानुसार विठ्ठलाची व दिंडी सोहळ्याची महती सोशल नेटवर्कद्वारे जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. संत तुकाराममहाराजांचे वंशज स्वप्निल मोरे या युवकाने फेसबुक दिंडी सुरू केली असून या दिंडीत तीन लाख इंटरनेट वारकरी सहभागी झाले आहेत.
आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. पायी दिंडीचा हा सोहळा एक विलक्षण अनुभव असतो. मात्र या सोहळ्यात सर्वानाच सामील होणे शक्य नसते. स्वप्निल मोरे या तरुणाने हेच हेरून दोन वर्षांपूर्वी फेसबुक दिंडी (https://www.facebook.com/events/143949362455251) सुरू केली. संत तुकाराममहाराजांचे वंशज असल्यामुळे स्वप्निलने पहिले दोन वर्ष तुकाराम महाराजांच्या दिंडीतील प्रत्येक घडामोडी कॅमेऱ्यामध्ये कैद करून त्या फेसबुक िदडीवर टाकल्या. अल्पावधीत याला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन वर्षांत या फेसबुक दिंडीमध्ये जवळपास तीन लाख इंटरनेट वारकरी सहभागी झाल आहेत. विशेषत: परदेशातदखील ही फेसबुक दिंडी गाजत आहे. यामुळे स्वप्निलने यंदा संत ज्ञानेश्वरमहाराजा पालखी सोहळ्याचे देखील इव्हेंट नेटवर टाकण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये त्याला प्रज्ञेश मोळक व आकाश चटके मदत करणार आहेत. आध्यात्मिक वारसा लाभलेल्या व श्री विठ्ठलाचे पुजारी असलेल्या श्रीराम गोपाळ बडवे हा महाविद्यालयीन तरुणदेखील या फेसबुक दिंडीचा आपल्या परीने प्रचार करीत आहे. या दिंडीसह श्रीरामने फेसबुकवरच बडवे  (www.facebook.com/badaves) ही लिंक सुरू केली असून यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची विविध छायाचित्रं आहेत. यालादेखील मोठी पसंती मिळत आहे. आषाढीसाठी २९ व ३० जून रोजी अनुक्रमे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरमहाराज यांचे पालखी सोहळे पंढरीकडे निघाले आहेत. सध्या हा तरुणांचा ग्रुप फेसबुक दिंडीच्या प्रचाराला व तयारीला लागला आहे.
आजची पिढी परंपरा मोडीत काढत असल्याचा आरोप होतो. मात्र आपली नाळ तुटू न देता जुन्या परंपरेचा नव्या युगाशी मेळ घालण्याची कला या तरुणाईत आहे.