वर्षांकाठी साधारणपणे नऊ हजार असे प्रसुतीचे प्रमाण येथील जिल्हा रुग्णालयात असले तरी सोईसुविधांची मात्र वानवा आहे. तथापि, मागील अनेक वर्षांत त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. या रुग्णालयावरील वाढता ताण कमी करण्यासाठी महापालिकेने सवरेपचार रुग्णालय कार्यान्वित करण्याची निकड आहे.
अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी धुळ्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सद्यस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना निवेदनात दिली आहे. सवरेपचार रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागात रुग्णाचा एक्स रे काढण्यात येतो आणि अल्ट्रा सोनोग्राफी करण्यात येते. सीटी स्कॅनची आवश्यकता असल्यास चक्करबर्डी येथील महाविद्यालयाच्या इमारतीत रुग्णास नेले जाते. रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या एमआरआयची यंत्रसामग्री नाही. अस्थिरोग विभागावर राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे भार वाढला आहे. असुविधेमुळे रुग्णांची हेळसांड होते. शस्त्रक्रिया विभाग ‘एमसीआय’च्या निकषाप्रमाणे नाही. त्यामुळे सक्षम डॉक्टर असूनही मर्यादा आल्या असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे. जळीत कक्षात रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष नाही. प्रसुती व स्त्रीरोग विभागात ८० खाटा असल्या तरी रुग्णांची संख्या पाहता त्या अपूर्ण पडतात. धुळे जिल्ह्यात वर्षभरात १८ ते १९ हजार प्रसुती होतात. या एकाच रुग्णालयात वर्षभरात साधारणत नऊ हजार प्रसुती होतात. ही संख्या पाहता शासनाने या कक्षाकडे विशेष लक्ष देण्याची निकड आहे. ग्रामीण रुग्णालये गुंतागुंतीची प्रसुती नसतानाही रुग्णांना अनेकदा धुळ्याच्या या रुग्णालयात पाठवितात. नाशिक जिल्ह्यातील रुग्णही येत असल्याने या रुग्णालयाचा बोजा वाढला आहे. सर्वसाधारण बाळांतपणातील रुग्णांना किमान ४८ तास प्रसुतीनंतर ठेवावे असे संकेत असताना खाटांचा अभाव असल्याने या रुग्णांना २४ तासांत सोडून दिले जाते. शासनाच्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसुतीसाठीच्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत व रुग्णालयापासून घरापर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे या रुग्णालयाकडे नेहमी ओघ असतो. त्या तुलनेत धुळे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात वर्षांकाठी सरासरी एक हजार प्रसुती होत असल्याची माहिती आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण झालेल्या व मोडकळीस आलेल्या अपुऱ्या जागेच्या, अपूर्ण यंत्रसामग्री व सुविधा असलेल्या या कक्षात प्रसुतीचे काम करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठय़ा दिव्यातून रोज जावे लागते. रुग्णांच्या तुलनेत कमी संख्येने असलेल्या परिचारिकांना एकाच वेळी सर्व रुग्णांकडे लक्ष देण्याची कसरत करावी लागते. संपूर्ण रुग्णालयाचा विचार केल्यास वर्ग तीन व चारचे कर्मचारी आणि परिचारिकांची कमतरता आहे. चक्करबर्डीच्या शासकीय महाविद्यालयात उपरोक्त सुविधा निर्माण करता येतील. तसेच कर्करोग रुग्णांसाठी डायलेसीस युनिटही सुरू करता येईल, असे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे.
शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील रुग्णसेवेचे मोठे आव्हान दिवसेंदिवस पेलावे लागत आहे. त्यासाठी इतर महापालिकांच्या धर्तीवर धुळे महापालिकेने सर्व प्रकारच्या साधारण व किरकोळ आजारांसाठी एक सवरेपचार रुग्णालय उभे करणे गरजेचे आहे. महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय उभे राहिल्यास रुग्णांना शासकीय सवरेपचार रुग्णालयावर अवलंबून राहावे लागणार नाही. वैद्यकीय महाविद्यालय स्वत:च्या जागेत जाण्यासाठी तसेच शासनाने मंजूर केलेले महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय सवरेपचार रुग्णालयात त्वरित सुरू होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.     (उत्तरार्ध)