राज्य कृषी पणन मंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाने आंबाउत्पादक शेतकऱ्यांसाठी आंबा पिकवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयाचे येथे आंबा व डाळिंब निर्यात सुविधा केंद्र आहे. या केंद्रात मराठवाडय़ातील केशर आंबा व डाळिंब निर्यात करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. राज्यात निर्यातवाढीस प्रोत्साहन देण्याचे धोरण कृषी पणन मंडळाच्या घेण्यात येते. या योजनेंतर्गत येथील केंद्रात २५ मेट्रिक टन क्षमतेची फळे पिकवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आंबा, केळी आदी फळे सरकारमान्य आरोग्यदायी पद्धतीने पिकविण्यासाठी ही सुविधा आहे. केंद्रात प्रत्येकी २५ मेट्रिक टन क्षमतेची चार शीतगृहे असून, सफरचंद, इतर फळे, ड्रायफ्रुट्स, डाळ, चिंच, मसाल्याचे पदार्थ थंड ठेवता येतात.

सध्या या केंद्रात आंबा पिकविण्याचे काम सुरू केले आहे. आंबा व केळीउत्पादक शेतकऱ्यांना येथे फळे पिकवून दिली जातात. रायपनिंग चेंबरद्वारे फळे पिकवली जात असल्यामुळे फळांची चव कायम राहते. साधारण एक किलो आंब्यासाठी एक रुपया आकारला जातो. सन २०११मध्ये जवळपास १२५ मेट्रिक टन आंबे या केंद्रात पिकविण्यात आले. मागील वर्षी २५ मेट्रिक टन आंबे पिकविण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक बी. टी. लवांड यांनी दिली. या सुविधेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.