जिल्ह्य़ातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुविधा निकषांप्रमाणे आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग या शाळांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. विभागाने त्यावर नागरीक, पालक यांच्याकडून हरकतीही मागवल्या आहेत. जिल्ह्य़ातील ३०५ प्राथमिक व ९७४ माध्यमिक शाळांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ‘एनएजीएआरझेडपी डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर ही माहिती उद्याच (शुक्रवार) प्रसिद्ध केली जाणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमाद्वारे आता खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना दर तीन वर्षांनी मान्यता घेणे बंधनकारक आहे. ही मान्यता देताना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आरटीई कायद्यानुसार शाळांनी निकषानुसार भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत की नाही, याची तपासणी करायची आहे.
या कायद्यानुसार शाळांनी त्यांच्याकडील सुविधांबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे, हे प्रतिज्ञापत्रच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात नमुद केलेल्या माहितीनुसार सुविधा उपलब्ध आहेत की नाही, यावर नागरीक, पालक, विद्यार्थ्यांकडुन हरकती मागवल्या जाणार आहेत. ११ निकषांचे हे प्रतिज्ञापत्र आहे, त्यात मुख्याध्यापक व शिक्षक खोली, संगणक कक्ष, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, क्रिडांगण, ग्रंथालय, रँप, कुंपण आदी बाबींचा समावेश आहे.