तरुणांना सुंदर मुलींचे आकर्षण असते. त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून ते धडपडत असतात. त्यासाठी ते अनेक उपद्व्यापही करत असतात. कधी कधी असे उपद्व्याप त्यांच्या अंगाशी येतात. राजस्थानमधील एका तरुणाने मुलींना आकर्षित करण्यासाठी त्याने एक अनोखी शक्कल लढवली. यामुळे मुली आपल्याकडे येतील अशी त्याला अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मुलींऐवजी मुंबई पोलीस त्याच्या दारात धडकले आणि या तरुणाला थेट तुरुंगाची हवा खाली लागली.
राहुल मल्होत्रा (नाव बदललेले) हा राजस्थानमधील २१ वर्षीय पदवीधर तरुण. सध्या तो बेरोजगार होता. त्यालाही इतर मुलांप्रमाणे मुलींचे आकर्षण होते. चित्रपटात काम करणाऱ्या मॉडेल्स, अभिनेत्रींच्या सौंदर्याने त्याला वेड लावले होते. त्यातूनच त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. सेलिब्रेटींच्या नावाने जर फेसबुक खाते उघडले तर..? असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने प्रख्यात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते बनवले. जुलै २०१४ मध्ये त्याने हे बनावट खाते उघडले आणि मुलींशी संवाद साधायला सुरुवात केली. खुद्द महेश भट्ट असल्याने अनेक चित्रपटसृष्टीतील मुली त्याच्या फेसबुक फ्रेण्डस् बनल्या. राहुल त्यांच्याशी महेश भट्ट बनून ऑनलाइन संवाद साधत असे. काहींना त्याने चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले होते. वेळ आली तर महेश भट्ट यांचा साहाय्यक म्हणून तरुणींसमोर जायचे अशी त्याची योजना होती. तो या आनंदाच्या मनोराज्यात रंगला असताना पश्चिम बंगालमधील रिषिन बॅनर्जी या दिग्दर्शकानेही महेश भट्ट समजून राहुलशी संवाद साधला. पण त्यांना थोडा संशय आला आणि त्याने थेट खऱ्याखुऱ्या महेश भट्ट यांना फोन लावला. आपले असे कुठलेच फेसबुक खाते नसल्याचे महेश भट्ट यांनी सांगितले. त्याच काळात महेश भट्ट यांच्यावर गुंड रवी पुजारी टोळीने रचलेला हल्ल्याचा कट उघडकीस आला होता. त्यामुळे भट्ट यांनी कुठलाही धोका पत्करायचा नसल्याने थेट मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे धाव घेतली.

तोतया महेश भट्ट सापडला..
सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस आयुक्त के.एम.प्रसन्ना, पोलीस उपायुक्त (गुन्हे प्रकटीकरण ) डॉ.धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. अमेरिकेतील फेसबुक कंपनीकडे संपर्क करून या फेसबुकचा आयपी अ‍ॅड्रेस मिळवला तर तो राजस्थानमधील होता. हे खाते उघडण्यासाठी राहुलने आपल्या मित्राचा मोबाइल क्रमांकही दिला होता (हल्ली फेसबुक खाते उघडण्यासाठी मोबाइल क्रमांक लागतो.) फेसबुक कंपनीकडून पोलिसांना हा मोबाइल क्रमांक मिळाला. पोलिसांनी मग राजस्थानमध्ये जाऊन राहुलच्या मित्राला ताब्यात घेतले. त्याला याबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त फेसबुक खात्यासाठी राहुलने आपला मोबाइल क्रमांक वापरलाय एवढेच त्याला माहीत होते. तेथून मग पोलीस राहुलच्या दारात पोहोचले आणि त्याला मुंबईला आणले. मुलींच्या आकर्षणापोटी गंमत म्हणून राहुल हे कृत्य करत होता. यापूर्वी त्याने अभिनेता रणदीप हुड्डा, दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांच्या नावानेही फेसबुक खाते उघडले होते, अशी माहिती मुकुंद पवार यांनी दिली.