इमामवाडा व गणेशपेठ परिसरात तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी एका वृद्धेसह दोघांना गंडा घालून त्यांच्या जवळचे १ लाख ८० हजारांचे दागिने लंपास केले.
वकीलपेठ इमामवाडा येथील जिजा देवेंद्र घरडे (६१) या बुधवारी सकाळी ११.४५ वाजता सेंट्रल बँकेतून घरी परत जात असताना रेशीमबाग चौकातील प्रिया बारजवळ त्यांना तिघांनी रोखले. ‘आम्ही पोलीस आहोत. शहरात लुटमारीच्या घटना सुरू असताना तुम्ही अंगावर एवढे दागिने घालून कशाला फिरता’ असे म्हणून या भामटय़ांनी जिजा घरडे यांना अंगावरचे दागिने काढण्यास बाध्य केले. सोन्याच्या बांगडय़ा, कंठीहार तसेच सोन्याच्या दोन अंगठय़ा काढून घेतल्यानंतर ते पिशवीत ठेवल्याचा बनाव या भामटय़ांनी केला. ती पिशवी घरडे यांच्या हातात देऊन ते पसार झाले. घरी गेल्यानंतर घरडे यांनी पिशवी तपासून पाहिली असता त्यात दागिने दिसले नाहीत. भामटय़ांनी दागिने लंपास केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  
या घटनेच्या १५ मिनिटांपूर्वी बिलासपूर येथील एका व्यक्तीलाही व्हिजिलन्स ऑफिसर असल्याचे सांगून तीन भामटय़ांनी त्यांची सोन्याची अंगठी लंपास केली. बुधवारी सकाळी ११.३० वाजता एल. रामल्लू एल.ए. स्वामी हे गांधीसागर तलावाकडून रेल्वेस्थानकाकडे जात असताना गीता मंदिराजवळ तिघांनी त्यांना थांबवले आणि व्हिजिलन्स ऑफिसर असल्याचे सांगून त्यांनी रामल्लू यांच्या हातातील एक सोन्याची अंगठी काढून घेतली. इमामवाडा व गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून दोन्ही गुन्हे करणारे आरोपी एकच असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.