भूतबाधा काढण्यासाठी येथील गुरुवार पेठेत आलेल्या भोंदूबाबाने हातचलाखी करत मुस्लिम समाजातील एका कुटुंबाचे दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास करून सुमारे ५५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फारूख इनायतुल्ला मुजावर (वय ३५, रा. गुरुवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, त्यावर अज्ञात मांत्रिकाविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेलेली माहिती अशी, की फारूख इनायतुल्ला मुजावर (वय ३५) यांच्या भावाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत एका अनोळखी भोंदूबाबाने फारूख मुजावर यांच्या कुटुंबीयांना मुजावर यांच्या भावाला भूतबाधा झाली असल्याचे सांगितले तसेच त्यावरील उपाय आपल्याकडे असून काही विधी केल्यानंतर भूतबाधा दूर होईल असे सांगितले. घरातील सोन्याचे दागिने तांब्यात भरून ते घरात ठेवावे लागतील. काही अवधीनंतर या तांब्यातील मंतरलेले पाणी भूतबाधा झालेल्या व्यक्तीला आपण देऊ. त्यानंतर भूतबाधा दूर होईल असे त्या भोंदूबाबाने मुजावर कुटुंबीयांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुजावर कुटुंबीयांनी त्यास विधी करण्यास सहमती दिली. त्यामुळे त्या भोंदूबाबाने मुजावर यांच्या घरात विधी करण्याचा बहाणा करत घरातील स्टीलच्या तांब्यात थोडेसे पाणी ओतून घरातील दागिने आणण्यास सांगितले.
मुजावर यांनी त्यांच्या घरातील महिलेच्या गळय़ातील दीड तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ व अर्धा तोळय़ाच्या सोन्याच्या रिंगा आणून भोंदूच्या हातात दिल्या. ते दोन दागिने वेगवेगळय़ा कागदाच्या पुडय़ांत बांधत असल्याचा बहाणा करत भोंदूने ते दागिने हातचलाखी करून लांबवले तसेच खिळे व रुद्राक्षाची माळ वेगवेगळय़ा कागदाच्या पुडय़ात मुजावर कुटुंबीयांच्या नकळत ठेवून त्या पुडय़ा पाणी असलेल्या स्टीलच्या तांब्यात ठेवून दिल्या. सदरचा तांब्या घरात ठेवा. मी शुक्रवारी पुन्हा तुमच्या घरी येईन, तेव्हा यामधील पाणी आपण भूतबाधा झालेल्या व्यक्तीला देऊ असे सांगून तो भोंदूबाबा घरातून निघून गेला.
त्याने त्याचा मोबाइल क्रमांकही संपर्कासाठी मुजावर कुटुंबीयांना दिला होता, मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत वाट पाहूनही भोंदूबाबा घराकडे फिरकला नाही तसेच त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे फारूख मुजावर यांनी घरातील स्टीलच्या तांब्यातील कागदांच्या पुडय़ांची तपासणी केली तर त्यात सोन्याच्या दागिन्यांऐवजी खिळे व रुद्राक्षाची माळ असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून शहर पोलिसांनी अनोळखी भोंदूबाबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.