महाराष्ट्र, कर्नाटकात कमी पाऊस झाल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. बाजारात आवक कमी व मागणी जास्त यामुळे भाव चांगलेच वधारले आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत हरभऱ्याचे उत्पादन वाढल्यामुळे हरभऱ्याचे भाव मात्र लक्षणीय घसरले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून तुरीच्या हंगामात तुरीचे भाव वेगाने घसरू लागले आहेत. हंगाम संपल्यानंतरच भाववाढ होते. या वर्षी हंगामात तुरीचे भाव ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले. एकरी उत्पादन घटल्यामुळे या वर्षी तुरीचा भाव आणखी ५०० रुपयांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गतवर्षी हंगाम ओसरल्यानंतर तुरीच्या भावात पाच हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. त्यानंतर ३ हजार ६०० रुपयांपर्यंत घसरण झाली. या वर्षी पुन्हा तुरीचे भाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. हरभऱ्याचे भाव गतवर्षी ५ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. आता पिठलेही महाग अशा बातम्या सर्वत्र झळकत होत्या. या वर्षी हरभऱ्याच्या भावात चांगलीच घसरण झाली. प्रारंभी ३ हजार ६०० प्रतिक्विंटल असलेला भाव सध्या ३ हजार २०० रुपयांपर्यंत घसरला आहे. ही घसरण ३ हजार रुपयांपर्यंत राहील. त्यानंतर ती काही काळ स्थिर राहील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हरभऱ्याचे चांगले पीक आहे. त्यामुळे बाजारातील भावात घसरण झाली. मुगाचे भाव मात्र ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर, तर उडदाचे भाव ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. उडदासाठी सरकारचा हमीभाव ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असला, तरी उडदाची विक्री सरसकट ३ हजार ६०० रुपये दराने होताना दिसते. महाराष्ट्रात उडदाचे पीक खरीप हंगामात घेतले जाते, तर आंध्र, तामिळनाडू प्रांतात ते रब्बी हंगामात घेतले जाते. पंजाब, ओडिसा आदी सिंचनाच्या क्षेत्रातील भागात आता उन्हाळी उडदाचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. बाजारपेठेच्या गरजेनुसार उत्पादनात वाढ होत असल्यामुळे उडदाचे भाव मात्र कमी होत चालले आहेत. बाजारपेठेवर दुष्काळाचे चांगलेच सावट आहे. आहे तो माल मिळेल त्या किमतीत विकण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. नेमकी स्थिती काय असेल, भविष्यात भाव कसे राहतील? याचा अंदाज बांधणे भल्याभल्यांना कठीण होत असल्यामुळे शेतकरी आता जुगार खेळायला तयार नाहीत.
गेले पाच महिने सोयाबीनचे भाव स्थिर होते. शेतकऱ्यांच्या नशिबाने त्यात आता ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे बाजारपेठेतील सोयाबीनची आवकही दररोज वाढते आहे. ही भाववाढ किती काळ राहणार आहे? हे माहीत नसल्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनने चांगलीच उसळी मारली आहे.