आर्थिक अनिश्चितेच्या सावटाखाली असलेल्या भारतीय कंपन्या स्वत:च्या अंदाजपत्रकात मोठय़ा प्रमाणात कपात करणार असल्याने धार्मिक उत्सवाच्या काळात कंपन्यांचे धोरण कर्मचाऱ्यांच्या उत्साहावर विरजण घालेल, अशी भीती कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
मंगळवारी सेन्सेक्सने ६००पेक्षा जास्त अंकाने उसळी घेतली असली तरी पुढेही उसळी घेण्यात शेअर बाजार सातत्य दाखवेल, याची शाश्वती कंपन्यांना नाही. तसेच लगोलग काही दिवसांमध्ये कंपन्यांची स्थिती सुधारेल, असेही म्हणता येत नाही. अतिशय कठीण परिस्थितीत कंपन्यांना कारभार करावा लागत असून कंपन्यांचा दिवसेंदिवस घटता नफा आणि हाताशी नवीन काम नसल्याने कंपन्यांना आहे त्या स्थितीत तग धरून राहणे कठीण झाले आहे. त्यामुळेच सणासुदीच्या दिवसात कंपन्या ४० टक्के खर्चात कपात करणार असल्याचा अंदाज उद्योग मंडळाने एका सर्वेक्षणात व्यक्त केला आहे.
खर्चात कपात म्हणजे कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस नाकारणे किंवा तो कमी करण्यावर कंपन्यांचे व्यवस्थापन भर देणार आहे. दिवाळी, धनत्रयोदशी आणि ख्रिसमसच्या तोंडावर भारतीय कंपन्या खर्चात ४० टक्के कपात करणार, असल्याचे भाकित दी असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडिया(असोचेम) या उद्योग मंडळाने एका सर्वेक्षणात केले आहे.
उत्सवप्रिय महाराष्ट्रीय माणसास खर्चाची कात्री कुठेकुठे लावावी, असा प्रश्न पडला आहे. नुकतेच गणेशाचे आगमन झाले असून यापुढे महालक्ष्मी पूजन, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी, ख्रिसमस असे सण सलग येणार आहेत.  त्यातच कंपन्या खर्चात कपात करणार असल्याची चाहूल कर्मचाऱ्यांना लागल्याने सणासुदीत गोडधोड खाण्याच्या दिवसांत कंपनी कर्मचाऱ्यांची मिठाईची चव कडू होणार आहे. असोचेमच्यावतीने करण्यात आलेले हे सर्वेक्षण अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, जयपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नागपूर अशा मोठय़ा शहरांमध्ये करण्यात आले. त्यासाठी जवळपास २५०० लहान, मध्यम आणि मोठय़ा कंपन्यांचे नमुने सर्वेक्षणात अंतर्भूत करण्यात आले. हे सर्वेक्षण फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, रत्न, अलंकार, वाहन, एफएमसीजी, पायाभूतसुविधा निर्माणसुविधाक्षेत्र इत्यादी कंपन्यांमध्ये करण्यात आले आहे. उपरोक्त क्षेत्रांत काम करणाऱ्या बहुतेक कंपन्या आर्थिक मंदीमुळे घायकुतीला आल्या आहेत.
असोचेमच्या मते यावर्षी सणांच्या मुहूर्तावर टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, स्वयंपाक घरातील उपकरणे, मोबाईल हँडसेट, एक्सेसरिज आणि संगणक खेळ आदींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे व्यवहार थंड आहेत. विविध कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर करणार असलेल्या खर्चात कपात करणार असल्याने साहजिकच टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, फ्रीज, संगणक खेळ, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यास कंपनी कर्मचारी धजावणार नाहीत, ही वस्तुस्थिती उघड आहे.