प्रेमसंबंधात कधी मस्ती म्हणून कधी जोडीदाराचा आग्रह म्हणून ‘नाजूक क्षणांचे’  केलेले चित्रण नंतर खूप महागात पडू शकते हा प्रकार नवा नाही. गेल्या काही दिवसांत अशा चित्रणाचा वापर करून तरुणींना ब्लॅकमेल करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणात नंतर तक्रार करून आरोपींना अटक झालेली आहे. परंतु अशाचित्रफीती सार्वजनिक झाल्याने संबंधित तरुणी मात्र उद्ध्वस्त झाल्या आहेत.
*  पतीनेच दिला दगा!
भाईंदर येथे राहणाऱ्या आशुतोष गांगुली (नाव बदललेले) या २५ वर्षीय तरुणाचा २०१२ मध्ये रूपाबरोबर प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीचा काळ आनंदात गेल्यानंतर काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला. काही दिवसांपूर्वी रूपाच्या भावाच्या एका मित्राला एका पोर्न साइटवर रूपाचा अश्लील व्हिडियो दिसला. त्याने रूपाच्या भावाला हा प्रकार सांगितला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण हा व्हिडीयो अन्य कुणी नाही तर चक्क आशुतोषनेच काढला होता. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात त्या नाजूक क्षणांचे चित्रण त्यांनी करून ठेवले होते. आपला पतीच असे चित्रण करत असल्याने रूपाचीही त्याला हरकत नव्हती. पण मग परिस्थिती बदलल्यानंतर रूपाचा बदला घेण्यासाठी आशुतोषने हा व्हिडियो अश्लील संकेतस्थळावर अपलोड केला होता. घटस्फोटानंतर सारे काही संपले होते. अशावेळी आशुतोष असे काही करेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. रूपा आणि तिच्या भावाने नवघर पोलिसात याप्रकरणी तक्रार केल्यानंतर ६ जून रोजी आशुतोषला अटक करण्यात आली.
*  मित्राने फसवले
मालवणीत राहणाऱ्या पूजा (नाव बदललेले) या तरुणीचे वीर शहा (२७) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सुरुवातीला त्याने पूजाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. या काळात तिच्या बेसावध क्षणी त्याने या संबंधांची चित्रफित तयार करून ठेवली होती. नंतर याच अश्लील चित्रफितीच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करून वारंवार बलात्कार करू लागला. शरीरसंबंध ठेवले नाही तर ही चित्रफित इंटरनेटवर, टाकेन अशी धमकी त्याने तिला दिली. त्यामुळे पूजाचा नाईलाज झाला. अखेर तिने हिम्मत करून पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मालवणी पोलिसांनी वीरला अटक केली.
*  मालक की दलाल?
मुलुंड येथील एक ३० वर्षीय गृहिणी अंधेरीत एका ठिकाणी कामाला जात होती. तेथील मालकाशी, अल्ताफशी तिचे प्रेमसंबंध जुळले. यानंतर तो तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. तिने सुरुवातीला पैसे दिले. मात्र नंतर नकार दिला. त्यावेळी अल्ताफने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आपल्या संबंधांच्या वेळी काढलेली चित्रफित त्याने तिच्या नवऱ्याला दाखविण्याची धमकी दिली. यामुळे ती पुरती फसली होती. मात्र अल्ताफ  नंतर तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करू लागला आणि पैसे मागू लागला. तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली आणि मुलुंड पोलिसांनी अल्ताफला अटक केली.
*  आंधळा विश्वास
कांदिवलीत राहणारी नेहा (नाव बदललेले) तंत्रविज्ञान महाविद्यालयात शिकत असताना हुरेश कुरेशी (२७) या मालवणीत राहणाऱ्या इस्टेट एजंटशी तिची ओळख झाली होती. कुरेशी विवाहित होता. मात्र ते त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. या काळात त्याने तिच्या नकळत तिची अश्लील चित्रफित तयार केली. याच चित्रफितीचा (एमएमएस) आधार घेऊन तो तिला धमकावत होता. नेहाने कुरेशीशी असलेले संबंध तोडले आणि त्याच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी महाविद्यालयही बदलले. मात्र तो तिला त्रास देतच राहिला. कुरेशीने ही अश्लील छायाचित्रे नेहाच्या नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. त्यामुळे नेहा पुरती उद्ध्वस्त झाली. तिने अखेर चारकोप पोलीस ठाण्यात कुरेशीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. नातेवाईकांकडे या चित्रफिती पोहोचल्याने नेहाची अवस्था मात्र बिकट झाली..
दशकापूर्वी मोबाईल कॅमेरे आल्यानंतर अश्लील एमएमएम बनवण्याचे पेव फुटले होते. त्यावेळी तंत्रज्ञान आणि त्याच्या गैरवापराबद्दल तरुणी जागरूक नव्हत्या. नंतर त्या सावध झाल्या.  तरीसुद्धा अनेक जणी अजूनही त्याला बळी पडत आहेत. अनेकदा जोडीदाराचा आग्रह असतो म्हणून त्या ‘नाजूक संबंधांच्या’ चित्रफितीला परवानगी देतात किंवा ‘त्या’ वेळी पुरेशी सावधगिरी बाळगत नाही. अशा चित्रफिती किंवा छायाचित्रे मोबाईलमधून नष्ट जरी केली तरी सहज उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरच्या आधारे ती पुन्हा मिळवता येतात. एखाद्या वेळी मेमरी कार्ड गहाळ झाले तर कुणीही या सॉफ्टवेअरच्या आधारे अशी छायाचित्रे पुन्हा मिळवून त्याचा गैरवापर करू शकतो. टीव्ही माध्यमातील एका महिला पत्रकाराला दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले होते. वेळीच असे प्रकार थांबवणे आणि पुरेशी काळजी घेणे गरजेचे आवश्यक आहे, असा सायबरतज्ज्ञांचा सल्ला आहे.