येथील फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक उजळणी वर्ग माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम आणि नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमात मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे डॉ. संजय पांडे, डॉ. मंदार देशपांडे तसेच नाशिक मधील देवदत्त चाफेकर, शरद पाटील, चैतन्य बुवा, चंद्रशेखर पेठे, संतोष रावलानी, तुषार गोडबोले यांची व्याख्याने झाली. जीवघेणी स्पर्धा व धावपळीमुळे भविष्यात शारीरिक आजारांबरोबर मानसिक आजारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याचे बाम यांनी नमूद केले. सामान्य जनतेला उत्कृष्ट दर्जाची व तत्पर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नव्याने प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता कमलाकर यांनी मांडली. व्यासपीठावर डॉ. कैलास कमोद, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा औंधकर, सचिव डॉ. हरीकिसन लाहोटी, खजिनदार डॉ. गुलाब घरटे उपस्थित होते.
या वेळी ‘सुसंवाद’च्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन तसेच मातोश्री सीतामाई सोपे ट्रस्टच्या सौजन्याने आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. डॉ. कमोद यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. आशुतोष भट यांनी केले. उजळणी वर्गाला नाशिक परिसरातील १५०हून अधिक डॉक्टर उपस्थित होते.