नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरक्षित सोडतीनुसार महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले असल्याने गेली वीस वर्षे महापालिकेत सत्ता सांभाळणाऱ्या पुरुष नगरसेवकांनी आपल्या पत्नीला, मुलीला व सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव ते मतदान संपेपर्यंत महिला उमदेवारांची मदार त्यांच्या कुटुंबीयांनी  सांभाळली होती. राजकारणाचा अनुभव नसल्याने व काहींची निवडणूक लढविण्याची पहिलीच वेळ असल्याने या महिला उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहावयास मिळाले.  
पालिकेत यंदा महिला राज येणार आहे. ५० टक्क्याहून अधिक महिला लोकप्रतिनिधी म्हणून आजच्या मतदानप्रक्रियेनंतर महापालिकेत जाणार आहेत. ऐनवेळेला आरक्षण सोडतीने नगरसेवकांना बसलेला फटका त्यांनी पत्नी, मुलगी व सुनेला उमेदवार म्हणून रिंगणात संधी देऊन पूर्ण केला. प्रभागातील नगरसेवकांचे कार्यकर्त्यांशी तोंडओळख असल्याने महिला उमेदवार केवळ फोटो सेशनसाठी समोर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
आजच्या मतदाना दिवशीदेखील महिला उमेदवार मतदारांना आवाहन करण्यासाठी न आल्याने त्यांच्या पतीराजानींच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारांच्या घरोघरी जाऊन आवाहन करण्याची भूमिका बजावली. एकंदरीत नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत महिला राज आले असले तरी त्यांचा रिमोट कंट्रोल मात्र पतीराजाच्या हातात असल्याने महिला उमेदवारांना त्यांच्या हातूनच पुढील कारभार करावा लगणार आहे. राजकीय पक्षांनी दिलेले संधी तर दुसरीकडे आजवर कार्यकर्त्यांशी कधीही न जोडल्या गेलेल्या नवख्या महिला उमेदवारांनी आजच्या दिवशी घरी राहणेच पसंत केल्याचे चित्र येथे पाहावयास मिळाले.
शरद वागदरे, नवी मुंबई