सोलापूर जिल्ह्य़ासह आसपासच्या भागातील भीषण दुष्काळाची स्थिती पाहता यापुढे केवळ उजनी धरणातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागणे अशक्य आहे. त्यासाठी आपण यापूर्वीच सुचविलेली कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लागणे ही काळाची गरज आहे. त्याशिवाय दुष्काळी सोलापूर जिल्ह्य़ाचे भाग्य उजळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना अजिबात अव्यवहार्य नाही. ही योजना महत्त्वाकांक्षी असून ती मार्गी लागण्यासाठी सर्वाचे प्रयत्न व सहकार्याची गरज असल्याचे मोहिते-पाटील यांनी नमूद केले.
मोहोळ तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत नेते ए. आर. डी. शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ.सदानंद मोरे यांना मोहिते-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला; त्या वेळी ते बोलत होते. २५ हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मोहोळ येथील घाटुळे मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी भूषविले. या प्रसंगी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, सोलापूरच्या माजी आमदार निर्मला ठोकळ, माढय़ाचे माजी  आमदार धनाजी साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, बाबासाहेब क्षीरसागर, कौशिक गायकवाड, पंढरीनाथ गावडे, शाहीन शेख, जमील शेख, फातीमा शेख, शहाजहान शेख, गझलकार बदिउज्जमा बिराजदार आदी उपस्थित होते.या वेळी ए. आर. डी. शेख यांच्या स्मरणार्थ अन्य विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. युवा शक्ती पुरस्कार संग्रामसिंह डोंगरे प्रतिष्ठानला देण्यात आला. तर चित्रकार शशिकांत धोत्रे यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. तसेच शेख यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या रुग्णावाहिकेचा शुभारंभ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला.
सोलापूर जिल्हा परिषदेत १९७२ साली आपण अध्यक्षपदावर असताना ए. आर. डी.शेख यांनी सहकारी म्हणून दिलेली साथ महत्त्वाची होती. शेख यांनी त्या वेळी दूरदृष्टी ठेऊन भूमिगत बंधारे बांधण्याची संकल्पना मांडली होती. सध्या १९७२ च्या पेक्षा अधिक भीषण दुष्काळ पडला असताना शेख यांची भूमिगत बंधारे बांधण्याची संकल्पना आजही उपयुक्त असल्याचे गौरवोद्गार मोहिते-पाटील यांनी काढले. राजन पाटील यांनी, राजकारणात पक्षनिष्ठा किती व कशी असावी,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ए. आर. डी. शेख होत. त्यांच्याकडूनच आपण समाजकारणाचे धडे घेतल्याचे नमूद केले. या वेळी आनंदराव देवकते यांचेही भाषण झाले. ए. आर. डी. शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष गो. मा. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.