tv10महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. अगदी काही मैलांच्या अंतरांनी पदार्थाची चव किंवा बनवण्याची पद्धत बदललेली पाहायला मिळते. याच खाद्यसंस्कृतीत मिसळीला मानाचे स्थान आहे. मिसळ म्हणजे, महाराष्ट्रातल्या वैविध्यतेचे एकात्मिक रूपच जणू. उसळीचे मूळ हिंदू संस्कृतीत, तर पाव ख्रिस्ती समाजजीवनातील महत्त्वाचा खाद्यघटक, फरसाणाला पाश्र्वभूमीवर गुजरातची. अशा वेगवेगळय़ा संस्कृतीतील घटकांचे मिश्रण म्हणजे मिसळ. सहज मिसळून जाते ती मिसळ. ती नववधूप्रमाणे असते. ज्या गावी जावे, त्यासारखे व्हावे हा मिसळीचा मुख्य गुणधर्म. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र मिळत असली तरी प्रत्येक ठिकाणी तिच्या चवीला त्या त्या भागाच्या संस्कृतीची लज्जत असते. त्यातही पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि ठाणे येथील मिसळ विशेष चवीच्या. त्या त्या ठिकाणच्या मिसळीची चव चाखायची असेल तर तेथेच जायचे, असं म्हटलं जातं. पण ठाण्यातील ‘सुरुची’त गेलं की या सर्व ठिकाणची मिसळ खायची आपली इच्छा एकाच ठिकाणी पूर्ण होते. शिवाय अन्य कुठेही मिळणार नाही, अशी खास ‘सुरुची स्पेशल’ ही येथे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी उपलब्ध आहे. तिखट, मध्यम आणि कमी तिखट अशा तीन प्रकारांमध्ये कोल्हापुरी आणि सुरुची स्पेशल मिळते तर पुणे मिसळ मात्र एकाच प्रकारची आहे. थोडक्यात सुरुची कॉर्नर या मिसळ संस्कृतीचा लसावि आहे.
‘सुरुची’तल्या कोल्हापूरच्या मिसळमध्ये मटकीची उसळ, कांदा-लसूण मसाला, पोह्य़ाचा चिवडा आणि बारीक शेव असते. पुणेरी मिसळमध्ये पुण्यात मिळणाऱ्या पाच मिसळींचे मिश्रण आहे. ‘सुरुची स्पेशल’ मिसळ, हिरव्या वाटाण्याची उसळ आणि पापडी, गाठी आणि बारीक शेव अशा तीन प्रकारच्या फरसाणाने बनलेली असते. या सर्व मिसळींना त्या त्या प्रदेशांची चव आहे. पण ‘सुरुची’च्या खास चवीचे रहस्य त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घरगुती मसाल्यांमध्ये आहे. पुण्याच्या मिसळीमध्ये खास काळा ब्राह्मणी गोडा मसाला वापरला जातो. याशिवाय येथे उपवासाची मिसळही मिळते. त्यात साबुदाण्याची खिचडी, दाण्याची आमटी, बटाटाच्या सळ्या (तिखट व साध्या) आणि तळलेले शेंगदाणे असतात.  
ठाणे आणि मिसळ हे जणू समीकरणच. यापूर्वी झणझणती, नाका-डोळ्यांतून पाणी काढणारी इथली प्रसिद्ध मिसळ बऱ्याचदा चर्चिली गेली. काही बडय़ा राजकीय नेत्यांची आवडती म्हणून या मिसळीचा कोण रुबाब. अशा झणझणीत तवंगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठाण्यात ‘सुरुची’च्या रूपाने काहीशी ‘मवाळ’ तरीही चटकदार मिसळ ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे.

उत्तम चवीचा ध्यास
अजित मोघे यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रभर फिरून, ठिकठिकाणच्या मिसळींची चव चाखून ठाण्यात सुरुची कॉर्नर सुरू केले. जे करायचे ते उत्तम हा त्यांचा ध्यास. त्यामुळे गुणवत्ता आणि चवीशी कोणतीही तडजोड न करता खवय्यांचे चोचले पुरविण्याचा त्यांचा उद्योग आता चांगलाच नावारूपाला आला आहे. त्यांच्या या छोटेखानी गाळ्यात प्रत्येक मिसळीत काय काय आहे, त्याचे तपशील ठळकपणे मांडलेले दिसतात. त्यातून त्यांची पारदर्शकता दिसते. लवकरच ते नाशिकची काळ्या वाटाण्याची मिसळही सुरुचीमध्ये उपलब्ध करून देणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत येथे मिसळ मिळते. सोमवारी सुरुची कॉर्नर बंद असते.