जिल्ह्यातील लोअर दुधना धरण ४२ टक्के, तर येलदरी धरण २७ टक्के भरले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या साठय़ात मोठी वाढ झाली. दोन्ही धरणांवर जिल्ह्यातील सिंचनासह काही शहरे व गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
गेल्या ऑक्टोबपर्यंत लोअर दुधना प्रकल्पात ८० दशलक्ष घनमीटर पाणी होते. या वर्षी गुरुवापर्यंत १४४ दलघमी पाणी साठले. एकूण क्षमतेच्या ४२ टक्के साठा लोअर दुधना प्रकल्पात झाला. गेल्या दोन दिवसांत प्रकल्पात ५४ दलघमी पाणी आले. अजून बराच पावसाळा शिल्लक आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत पिके बरी असली व पावसाने वार्षकि सरासरीच्या निम्मा टप्पा ओलांडला असला, तरी जिल्ह्यातले दोन्ही जलसाठे तळाला गेले होते. गतवर्षी दोन्ही प्रकल्पांत केवळ मृतसाठा शिल्लक होता. यंदाच्या पावसाने या दोन्ही प्रकल्पांत समाधानकारक पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट आता दूर झाले आहे.
परभणी शहराला येलदरीतून पाणीपुरवठा होतो. राहाटी पात्रात पावसाळ्यात पाणी असते. मात्र, पाणी संपल्यानंतर उन्हाळ्यात येलदरीहून हे पाणी राहटी पात्रात दाखल होते. गतवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येलदरीत केवळ ८ टक्के पाणी होते. या वर्षी संततधार पावसामुळे येलदरीत ९३५ दलघमी पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. या धरणाखाली असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पातही तब्बल ६९ टक्के पाणी आले. परभणीसह जिंतूर व आसपासच्या काही गावांचा पाणीपुरवठा येलदरीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात हे दोन्ही सिंचन प्रकल्प मोठे आहेत. येलदरीवर परभणीच्या वाढीव पाणीयोजनेचीही भिस्त आहे.
बुलढाणा जिल्ह्यात जास्त पाऊस झाल्यास येलदरी धरणाला त्याचा लाभ होतो. परतूर, मंठा तालुक्यांत पाऊस झाल्यानंतर लोअर दुधना प्रकल्पाला लाभ होतो. चार दिवसांपूर्वी मंठा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मंठय़ात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा ओघ लोअर दुधनात येत आहे. केवळ दोन मोठय़ा पावसांमुळेच या धरणाचा जलसाठा ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला.