हमखास पैसा मिळवून देणारे पीक ठरलेल्या कापसाने या वर्षीही शेतकऱ्यांची निराशा केली. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आणि अपेक्षित उतारा न मिळाल्याने या पिकाचे अर्थकारण शेतकऱ्यांना खिंडीत गाठणारे ठरले.
हिंगोलीत बुधवारी कापसाला ५ हजार २२० ते ५ हजार ३१२ क्विंटल असा भाव मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. गतवर्षी हंगामाअखेर १ लाख १० हजार क्विंटल खरेदी झाली होती. जिल्ह्यात चालू वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा अधिक केला. मात्र, कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतेक ठिकाणी पिकाची वाईट अवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापसाचे पीक मोडून गहू, ज्वारी या सारखी पिके घेतली. त्यातच कापसाला यंदा कमी उतारा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. गेल्या नोव्हेंबरमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ झाला. परंतु समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कापूस बाजारात आणला.
कापसाला ५ हजार २२० ते ५ हजार ३१२ रुपये क्विंटल भाव मिळाल्याने कापसाची आवक वाढली आहे. बाजार समितीकडून कापूस विक्री संबंधी होत असलेल्या नियोजनाबद्दल शेतकरी वर्गात समाधान आहे. बुधवारी ६२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती समितीचे सचिव जब्बार पटेल यांनी दिली. गतवर्षी हंगामाअखेर १ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. चालू वर्षी कापसाचा पेरा अधिक होऊनही लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक मोडून काढावे लागले, तर कापसाला उतारा कमी आल्याने शेतकरीवर्गाचे नुकसान झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कापसाच्या पिकाने दगा दिल्याची भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.