दुष्काळाचे चटके सहनही होत नाहीत आणि सांगूनही उपयोग नाही, अशी शेतकऱ्यांची सध्या स्थिती आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ातील बहुतांशी शेतकरी जेव्हा जेमतेम आलेले कापसाचे थोडेबहुत पीक विक्रीला घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या हातात येते ‘उलटी पट्टी.’ जेवढे पैसे लागवडीसाठी खर्च केले, त्यापेक्षा कितीतरी कमी पटीत मिळणारी रक्कम असल्याने या उलटय़ा गणिताच्या चक्रात सर्व शेतकरी अडकले आहेत.
अंबड तालुक्यात आजही काही भागात पाणी आहे. गोदावरीला लागून असणाऱ्या काही भागात थोडाबहुत कापूस झाला. कैलास खरात यांना ६ एकर शेती. त्यातल्या अडीच एकरात त्यांनी कापूस लावला होता. कैलासरावांचा थोरला मुलगा भारत दुष्काळात काहीतरी पिकावे या साठी सतत धडपडत होता. कोठून-कोठून पाणी आणले. पण हाती फारसे काही लागले नाही. अंबडच्या बाजारपेठेत दोघेही बाप-लेक कापूस विक्रीसाठी घेऊन आले होते. ३ हजार ९५० रुपये क्विंटल दराने खासगी व्यापाऱ्याने कापूस खरेदी केला. अडीच एकरात या वर्षी फक्त चार क्विंटल कापूस निघाला. तसे खरातांचे शेत सुपीक. दरवर्षी याच जमिनीत ते एकरी १० क्विंटल उत्पादन घेतात. पाऊस आला नाही, पीक वाढले नाही. परिणामी उत्पादन घटले एवढे, की केलेला खर्चही हाती लागला नाही. १७ हजार ४१९ रुपये व्यापाऱ्याने त्यांच्या हाती ठेवले, तेव्हा त्यांच्या तरुण मुलाच्या डोळ्यात भवितव्याची चिंता दिसत होती.
भारत खरात म्हणाला, ‘३ हजार रुपये नांगरटीसाठी लागले. तेवढीच रक्कम ढेकळे फोडण्यासाठी खर्च झाली. ९५० रुपयांच्या प्रत्येकी तीन पिशव्या बियाणांसाठी खर्च झाला होता. डीएपीए आणि युरिया ही खतेही दिली. वेचणीचा खर्चही मोठा होता. हाती काहीच लागले नाही.’ भारत खरातला दोन वर्षांचा मुलगा आहे. तो स्वत: नववीपर्यंत शिकला आहे. गेल्या वर्षी त्याने पीककर्ज घेतले नव्हते. पाऊस यायला आणखी सहा-आठ महिने लागतील. तोपर्यंत जवळ असलेली रक्कम पुरवायची कशी, असा प्रश्न आहे. त्यामुळे सगळेच गणित उलटे झाल्याने दु:ख कोणाला सांगायचे, असाच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कापसाच्या बरोबर मोसंबीची बागही आहे. थोडेसे पाणी असल्याने ती टिकून आहे. ऊन वाढले, की ती शुष्क होईल. पुढे काय करायचे, हे ना कैलास खरात यांना कळते, ना भारत खरात याला. दुष्काळाच्या फेऱ्यात अर्थकारणही फिरले आहे, एवढे नक्की.