सिंचनाच्या सोयींचा अभाव, यंदाची दुष्काळी परिस्थिती, उत्पादनात झालेली घट आणि कृषीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे, हे प्रश्न सुटल्याशिवाय अ‍ॅग्रोव्हिजनसारख्या प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञानाचा लाभ खऱ्या अर्थाने मिळणार नाही. हे प्रदर्शन म्हणजे एक जत्रा आहे. विविध कंपन्या येथे माल विक्रीसाठी एकत्र आल्या आहेत. हा व्यापार मेळावा आहे, अशा शब्दात अ‍ॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला आलेल्या शेतक ऱ्यांनी लोकसत्ताजवळ मनोगत व्यक्त केले.
आमच्या शेतात लागवड केलेली बियाणे आणि त्याच कंपनीने या प्रदर्शनात दाखवलेले त्याच बियाण्यांचे रोपटे आणि त्याला आलेले पीक यात मोठी तफावत आहे. बियाणे कंपन्या येथे देत असलेली माहिती आणि प्रत्यक्ष शेतक ऱ्यांना होत असलेले उत्पादन यात मोठा फरक आहे, अशी प्रतिक्रिया वर्धा जिल्ह्य़ातील कारंजा घाडगे येथील शेतकरी विलास धवड यांनी व्यक्त केली. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून यंदा त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. खत आणि भरपूर मेहनत घेऊनही यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. आपली शेती निसर्गाच्या भरवशावर आहे. निसर्गाची अवकृपा, सिंचनाच्या सोयींचा अभाव या अडचणींमुळे शेतकरी उत्पादन घेण्यास कमी पडतो. त्याच्या मूळ अडचणींकडे कोणाचेही लक्ष नाही. यंदा खर्च खूप आला, पण उत्पादन ५० टक्के घटले आणि मालाला भावही नाही. ही तूट कशी भरून काढणार, असा प्रश्न सुरेश उकडे यांनी उपस्थित केला.
 नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटकांवर अवलंबून असलेल्या शेतीत अनेक संधी असूनही शेतक ऱ्यांवर काही मर्यादा येतात. याचा अभ्यास करून शेतक ऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा उद्देशाने अ‍ॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असले तरी येथे केवळ माहिती मिळत आहे. स्टॉल्सवर पत्रके मिळत आहेत. विविध कंपन्यांनी एकत्रितपणे येथे त्यांच्या वस्तू व उत्पादने विक्रीसाठी प्रदर्शित केली आहेत. हा जाहिरातीचा प्रकार असून एक व्यापार मेळावा आहे, अशा शब्दात नांद येथील शेतकरी तुळशीदास चुटे यांनी मनोगत व्यक्त केले. येथील मोठी यंत्रे छोटय़ा शेतक ऱ्यांच्या काय कामाची? ही नवीन यंत्रसामुग्रीही सामान्य शेतकरी घेऊ शकत नाही. बुलडोजरसारखी मोठी यंत्रे ठेकेदारांसाठी आहेत. अशा प्रदर्शनाच्या आयोजनावर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च शेततळे बांधण्यासारख्या काही उत्पादक स्वरूपाच्या कामांवर खर्च झाला असता तर अधिक फायदा झाला असता, अशी प्रतिक्रियाही शेतक ऱ्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या विविध जिल्ह्य़ांतून शेतकरी या प्रदर्शनासाठी आले आहेत. बहुंताशी शेतक ऱ्यांनी विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर व मळणीयंत्रे व शेती उपयोगी उपकरणांची पाहणी केली. प्रदर्शनात मिळालेली माहिती उपयुक्त आहे. त्याचा फायदा होईल, असे मौदा येथील शेख मजीद म्हणाले. नांद येथील आनंदराव दांडेकर यांनी धान मळणीयंत्र, तोडणी यंत्राची पाहणी केली. यंदा दुष्काळी स्थिती आहे. नवीन तंत्रज्ञान छोटय़ा शेतक ऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे, असे ते म्हणाले.
वर्धा जिल्ह्य़ातील कवडापूर येथील शंकर जानबा धाडसे व गिरड येथील केशन नामदेवराव घरत यांनी या प्रदर्शनातील माहितीचा शेतीसाठी उपयोग करू, असे मनोगत व्यक्त केले.