गारपीट आणि पाऊस कधीच बंद झाला असला तरी त्यामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांचा अजूनही पाठपुरावा करतच असून, नाशिक जिल्ह्यात येवल्यासह बागलाण, देवळा, मालेगाव या तालुक्यांमध्ये जमिनीतील कांदा कुजल्याने शेतकरी हबकून गेला आहे. पातीतून पाणी कांद्यात गेल्याने कांदा कुजल्याचे स्पष्ट होत आहे. निकृष्ट झालेल्या कांद्यास भावही मिळत नसल्याने हे कांदे नदी-नाले तसेच उकिरडय़ांवर फेकून देण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली आहे.
गारपिटीनंतर सुमारे १५ दिवस वातावरण दमट राहिल्याने त्याचा परिणाम कांदा जमिनीतच कुजण्यात झाला. शेतातील कांदा काढावयास गेलेल्या शेतकऱ्यांच्या हातात कांद्याऐवजी त्याची पातच हातात येत आहे. पातीतून गेलेल्या पाण्याने कांदा कुजला. दरुगधी सुटलेले हे कांदे जनावरेही खात नसल्याने ते फेकून देण्याशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर राहिलेले नाही. यंदा पावसाळ्याने चांगली साथ दिल्याने शेतकरीवर्ग आनंदात होता, परंतु उन्हाळ्यात आलेला पाऊस आणि गारपीट यामुळे त्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. रासायनिक खतांच्या आकाशाला भिडलेल्या किमती, ऐन हंगामात बियाणाचा होणारा कृत्रिम तुटवडा या सर्व परिस्थितीला तोंड देत कर्ज काढून शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडे लक्ष केंद्रित केले होते. कांद्याची वाढही चांगली होती, परंतु पावसाने कांदा पुन्हा जमिनीत गाडून टाकण्याची वेळ येवला तालुक्यातील राजापूर, अंगुलगाव, न्याहारखेडा, रेंडाळे, ममदापूर, कोळगाव देवकाणे, सुरेगाव, भुलेगाव, अंदरसूल तसेच बागलाण तालुक्यातील अंतापूर, जायखेडा, आनंदपूर, बिजोटे आदी गावांतील शेतकऱ्यांवर आली.
थोडाफार बरा दिसणारा कांदा घेऊन शेतकरी बाजार समितीत जात असले तरी तेथेही व्यापाऱ्यांकडून या निकृष्ट दर्जाच्या कांद्याला अतिशय किरकोळ भाव मिळत असल्याने बाजार समितीपर्यंत कांदा नेण्याचा खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, गारपिटीतून बचावलेल्या आणि सध्या कोणताही भाव नसल्याने शेतातच जमा करून ठेवलेल्या कांद्याला आग लागल्याने तो भस्मसात झाल्याची घटना येवला तालुक्यातील सायगाव येथे घडली. बहुतांश वेळा रडविणारा कांदा कधीतरी हसविणार या आशेने शेतकरी कांद्याची लागवड करत असतो, परंतु मनासारखे होत नाही. सायगाव येथील रुंझाबाई बेंडू पठारे या महिलेने आपल्या शेतातून ८० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले, परंतु सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला भाव नसल्याने त्यांनी शेतातच तो जमा करून ठेवला. मंगळवारी रात्री कांदा जळाल्याचा वास आल्याने पठारे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे कांदा खाक झाला होता. जिल्हा बँकेचे दीड लाखांचे कर्ज घेत कांद्याची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेतली आहे.