एनबी कॅनॉलला त्वरित पाणी सोडण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एस. के. थोरात यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
एनबी कॅनॉलला त्वरित पाणी सोडण्यात यावे, सिंचनाच्या नियमाप्रमाणे टेल टू हेड पद्धतीने सिंचन करावे, एनबी कालवा पूर्णक्षमतेने चालवावा, श्रीरामपूर नगरपालिकेचा पाणीपुरवठा स्वतंत्र वाहिनीद्वारे मुख्य कालव्याला जोडावा अथवा एनबी कालव्यावरील तांत्रिक अडथळे दूर करून तो नियंत्रणमुक्त करावा, आदी मागण्यांसाठी सोमवारी माळेवाडी, भोकर, मुठेवाडगाव, उंदीरगाव, वडाळा महादेव, माळवाडगाव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या वडाळा उपविभागीय कार्यालयात उपोषण केले. शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अनिल औताडे व राजेंद्र पोखरकर यांच्या नेतृत्वाखालील उपोषणास शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, तालुका अध्यक्ष जितेंद्र भोसले, जिल्हा संघटक युवराज जगताप, सुरेश ताके, अण्णासाहेब ठोकळ यांनी उपस्थित राहून पािठबा दिला.
या वेळी अनिल औताडे, बाळासाहेब पटारे, कचरू औताडे, वसंतराव मुठे, सुरेश ताके, राजेंद्र पोखरकर, किशोर थोरात, भास्करराव औताडे, भागचंद औताडे आदींनी लाभधारक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. पाटबंधारे विभागाने या भागातील शेतकऱ्यांवर यापुढील काळात दक्षता घेऊन, अन्याय होऊ न देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एस. के. थोरात यांनी उपोषणार्थीची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एनबी कॅनॉलला येत्या दि. १३ रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. अन्य मागण्यांबातही त्यांनी सकारात्मक हमी दिली. त्यामुळे कृती समितीच्या वतीने उपोषण तूर्त स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले.