क्रॉम्प्टन वीज कंपनीने भारनियमनात काही दिवसांपूर्वी वाढ केल्याने संतप्त शेतकरी तसेच शिवसेनेने थेट कंपनीच्या येथील कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
ग्रामीण भागातील जळके, आव्हाणे यांसह जिल्ह्य़ातील इतरही अनेक गावांमध्ये रोहित्र नादुरुस्त असण्याचे कारण पुढे करीत भारनियमन सुरू केले होते. कंपनीकडून भारनियमन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, महिला आघाडीच्या संघटक शोभा चौधरी, राजेंद्र चव्हाण यांच्यासह कार्यालयावर धडक दिली. त्या ठिकाणी कनिष्ठ अभियंता एस. बी. चौधरी यांनी त्यांना उर्मटपणे उत्तरे देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी व शिवसेना पदाधिकारी अधिकच संतप्त झाले. त्यांच्यात वादविवाद झाले.
त्यानंतर वरिष्ठ अभियंत्यांनी मध्यस्थी करत बाजू समजून घेत भारनियमन होणार नाही असे आश्वासन दिले. शेतातील केळी, हरभरा या पिकांचे भारनियमनामुळे होणारे नुकसान लवकरच टळेल अशी पुष्टी जोडली.