सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळी प्रश्नावर सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेने मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन चालवले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. नदीत सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठीच असून ते शेतीसाठी वापरता येणार नाही, याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. या धरणे आंदोलनात भजनांचे कार्यक्रम होत आहेत.
दरम्यान, या आंदोलनाची कोंडी कायम असल्याच्या पाश्र्वभूमीवर जनहित शेतकरी संघटनेचे आणखी कार्यकर्ते उद्या सोमवारी मुंबईला जाऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष तथा मंोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आझाद मैदान ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यापर्यंत दिंडी यात्रा काढण्याचा बेत आंदोलकांनी आखला होता. परंतु मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिंडीच्या स्वरूपात न येता शिष्टमंडळ आल्यास भेट घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आंदोलकांच्या शिष्टमंडळाने वर्षां बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सोलापूर जिल्हय़ातील पाणीप्रश्नावर चर्चा केली.
उजनी धरणाचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडावे, बारामती येथील उद्योगाला व शेतीला पाणी देणे थांबवावे व प्राधान्यक्रमाने हे पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी व त्यानंतर उद्योगासाठी असा क्रम ठरला असतानासुद्धा ग्रामीण भागातील जीवनमान धोक्यात घालून जनतेच्या तोंडातील पाणी उद्योगासाठी देणाऱ्या राज्यकर्त्यांच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. तर मुख्यमंत्र्यांनी उजनी धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करताना धरणातील पाणी उजव्या व डाव्या कालल्यातून सोडल्यास त्याचा वापर शेतीसाठी नव्हे तर केवळ पिण्यासाठीच केला जाईल, याची लेखी हमी द्या, अशी अटवजा सूचना केली. मात्र आंदोलकांचे समाधान न झाल्याने आंदोलनाचा तिढा कायम आहे.
हे आंदोलन तीव्र करण्यासाठी उद्या सोमवारी सोलापूर जिल्हय़ातील आणखी शेतकरी व कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. यात पप्पू पाटील, विकास जाधव, कुमार गोडसे, अमर देशमुख, साधना देशमुख आदींचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे.