गतवर्षी झालेल्या ४२० मि.मी. पावसामुळे तालुक्यातील ३ हजार १२ शेतकऱ्यांचे ७१२ हेक्टरवरील क्षेत्र खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेले शेतकरी वर्ष झाले तरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत असून या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर चिभडे यांनी केली आहे.
गतवर्षी २३ जुलैला तालुक्यात एका दिवसात ४२० मि.मी. १७ इंच पाऊस पडल्याने तालुक्यातील आठही जलाशये १०० टक्के भरली होती. नद्यानाल्यांना पूर आल्याने नदीनाल्याकाठच्या शेताचे मोठे नुकसान झाले होते. या पावसामुळे तालुक्यातील टिटवी, गोत्रा, नांद्रा, रायगाव, धाड, गायखेड, देऊळगाव कंडपाळ, येवती, वझर आघाव, चिंचोली सांगळे, वडगाव तेजन, शारा आदी ठिकाणच्या ३ हजार १२ शेतकऱ्यांची ७१२ हेक्टर शेतजमीन खरडून गेली, परंतु यात दुरुस्त होणाऱ्या ६६१ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी १५ हजार रुपये, तर दुरुस्त न होणाऱ्या ५२ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात येणार होती. मात्र, अद्याप या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीनंतर झालेली गारपीट आणि आता पुन्हा पेरणीच्या काळात पावसाने मारलेल्या दडीमुळे बळीराजावर अस्मानीसोबत सुलतानी संकटही ओढावले आहे. खरडून गेलेल्या क्षेत्राचा सव्‍‌र्हे होऊन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवूनही शेतकरी वर्षभरापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप करण्याची मागणी ज्ञानेश्वर चिभडे यांनी केली आहे.