पहिले दोन दिवस थंड प्रतिसाद मिळालेल्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला शेवटच्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहिर व काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराच्या उरात धडकी भरली आहे. या अधिवेशनात चंद्रपूर व नांदेडमधून अनुक्रमे अ‍ॅड. वामनराव चटप व गुणवंत पाटील हंगर्णेकर यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले.
येथील चांदा क्लब ग्राऊंडवर शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे तीन दिवसीय १२ वे राष्ट्रीय संयुक्त अधिवेशन पार पडले. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांच्या हस्ते ८ नोव्हेंबरला या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. पहिले दोन दिवस या अधिवेशनाला शेतकऱ्यांची नगण्य उपस्थिती होती. उद्घाटनाला तर मंचावर पन्नास पाहुणे आणि समोर दीडशे शेतकरी इतका थंड प्रतिसाद होता. त्यानंतर झालेल्या शेती प्रश्न, कर्ज व वीजबिल मुक्ती, जैव तंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य आणि दुष्काळ व पाणी हे तिन्ही परिसंवाद व चर्चामध्येही वक्ते सोडले तर मंडपात शेतकऱ्यांची गर्दी नव्हती. शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद बघता शेतकरी संघटना संपली, अशीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी थोडीफार गर्दी दिसली, परंतु दहा वर्षांपूर्वी २००३ मध्ये याच मैदानावर झालेल्या ९ व्या अधिवेशनासारखी गर्दी अजून तरी दिसत नव्हती. ऐन दिवाळीत अधिवेशन आल्याने आणि सोयाबीन कापणी व कापूस वेचण्याचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकरी सहभागी झाले नाहीत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतरही दुसऱ्या दिवशी चर्चासत्र व परिसंवादाला काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांची गर्दी होती, मात्र उत्साह दिसत नव्हता.
परंतु शेवटच्या दिवशी प्रसिद्धीमाध्यम व पोलीस दलाने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवून या अधिवेशनाला हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली. केवळ गर्दीच केली नाही, तर कमालीचा उत्साह व काँग्रेस आघाडी सरकार व लोकप्रतिनिधींबद्दल कमालीची चीड शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळाली. प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे तब्बल आठ वर्षांनंतर शरद जोशी यांनी जाहीर भाषणातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आपल्या नेत्याशी संवाद साधतांना शेतकरी सुखावल्याचे चित्र येथे बघायला मिळाले.
या अधिवेशनात अगदी पहिल्याच दिवशी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. वामनराव चटप, तर नांदेडमधून गुणवंत पाटील हंगर्णेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्या दृष्टीने अधिवेशनात अ‍ॅड. चटप व हंगर्णेकर पाटील यांना प्रोजेक्टही करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत या दोघांना निवडून आणायचेच आहे, अशी शपथही शरद जोशी यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिली. पहिले दोन दिवस वगळता शेवटच्या दिवशी अधिवेशनाला झालेली गर्दी बघून भाजपचे खासदार हंसराज अहिर व काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या उरात धडकी भरली आहे. शेतकरी संघटनेने अ‍ॅड. चटप, भाजपने खासदार हंसराज अहिर यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया, पालकमंत्री संजय देवतळे, राजुराचे आमदार सुभाष धोटे व आमदार विजय वडेट्टीवार या चार नावांची चर्चा सुरू आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या वेळेवर जाहीर होणार असल्याने खासदार अहिर व अ‍ॅड. चटप यांना प्रचारासाठी भरपूर अवधी मिळणार आहे.
या दोन्ही नेत्यांनी ग्रामीण व शहरी भागांत प्रचाराला सुरुवातही केली आहे. कालच्या अधिवेशनात तर शेतकऱ्यांनी पदरचे पैसे खर्च करू, पण अ‍ॅड. चटप यांनाच या वेळी संधी देऊ, असे जाहीर केले. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एका मंचावर येण्याचे आवाहनही शरद जोशी यांनी या वेळी केले.
 त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेने चंद्रपूर व नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघात एप्रिलपर्यंत करावयाची आंदोलने, रास्ता रोको, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरची आंदोलने, तसेच शेतकऱ्यांच्याा प्रश्नांवर चक्का जाम व इतर आंदोलनाची रूपरेषाही तयार केली. २०१४ ची लोकसभा निवडणूक बघता शेतकरी संघटना या वेळी पूर्ण तयारीने रिंगणात उतरत असल्याने विद्यमान खासदार हंसराज अहिर  आणि  काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चिंता वाढली आहे.