पेरणीच्या मोसमावर बियाणे विक्री करताना विविध कंपन्या शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हय़ात खरीप हंगामातील ८० टक्के क्षेत्र सोयाबीनचे असून देशभरात तिसऱ्या क्रमांकाने सोयाबीन उत्पादन घेणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे विविध बियाणे कंपन्यांचा डोळा येथील शेतकऱ्यांवर असतो.
ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची लूट होण्याच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून घडताना दिसतात. शेतकरी संघटना लुटुपुटुचा विरोध करतात, हे गृहीत धरून बियाणे कंपन्या आपले बियाणे बाजारात रेटत असतात. गतवर्षी सोयाबीनचे पीक बाजारात आल्यानंतर त्याचा भाव प्रतिक्विंटल २८०० ते ३००० रुपये होता. बियाणे कंपन्यांनी सरासरी ३२०० रुपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीनची खरेदी केली. पेरणीच्या मोसमात बियाणे विक्रीसाठी विविध व्यापाऱ्यांकडून नोंदणी करून घेऊन १०० टक्के रक्कम उचलली. आता मालाचा पुरवठा करताना सोयाबीनचे प्रतिकिलो दर ५९ ते ८६ रुपये आहेत. व्यापाऱ्यांना नोंदणी केलेल्यापेक्षा केवळ ४० ते ५० टक्केच माल पुरवला जातो. बियाणे कंपन्यांनी बाजारात खरेदी केलेल्या बियाण्यांवर नेमकी प्रक्रिया काय केली? व्यवस्थापनावर खर्च किती केला? ते नफा किती कमावतात? यावर कोणाचेही बंधन राहिले नाही.
महिकोसारख्या दर्जेदार कंपनीने गेल्या महिन्यात १५७५ रुपये प्रतिबॅग एमआरपी दराचे सोयाबीन बियाणे विक्रीस उपलब्ध केले. या महिन्यात नव्याने दर १८०० रुपये करण्यात आला. महाबीजच्या वाणांना मोठी मागणी आहे. अनुदान दिले जाणारे वाण बाजारात अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे. अनुदान शेतकऱ्याला न मिळता त्याचे लाभार्थी भलतेच आहेत. कंपनीने थेट शेतकऱ्याला बियाणे खरेदीवर अनुदान देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गेल्या वर्षी महाबीजच्या ३३५ वाणांवर अनुदान दिले जात होते. या वर्षी या वाणाला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, कंपनीने यावर अनुदानच ठेवले नाही. अनुदानाचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. सोयाबीनच्या पिशवीचे विविध कंपन्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. ईगल १८०० रुपये, ग्रीनफील्ड १९५०, महाबीज १७४०, महिको २५ किलो १७५०. वानगीदाखलचे हे दर असून अनेक कंपन्यांचे वाण बाजारात आहेत. पाऊस पडला की पुन्हा सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवणार, हे निश्चित.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपल्याकडील घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. बियाण्याची उगवणक्षमता तपासून ते पेरावे, असे कृषी विभागाने सांगितले असले तरी तितका धीर शेतकऱ्यांना नसतो. पेरणीसाठी अतिशय कमी वेळ उपलब्ध असल्याने शेतकरी मिळेल, त्या किमतीत बाजारातून बियाणे घेण्यावर भर देतात. याचाच फायदा कंपन्या घेतात. तूर, उडीद, मूग आदी पिकांकडे शेतकऱ्यांचे लक्ष कमी झाले आहे. त्यामुळे या वाणाला मुळात बाजारात फारसा उठाव नाही. विविध कंपन्यांचे खताचे दर नवीन किमतीनुसार कमी करण्यात आले. मात्र, कंपन्यांनी व्यापाऱ्यांकडे विक्री करण्यासाठी यापूर्वीच प्रचंड माल दिला असल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना जुन्या दराने खत विकतात. एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असेल, तर कमी किमतीतच ती ग्राहकाला विकली गेली पाहिजे. पण असे होत नाही. शेतकऱ्यांची लूट सुरूच राहते.