पश्चिम विदर्भात ९० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपलेल्या असताना सर्वाधिक १४ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले गेले आहे. मात्र, तीळ, भुईमूग, सूर्यफूल यासारख्या तेलबिया पिकांचा पेरा कमी झाला असून दशकभरात तो निम्म्यावर आला आहे.
दहा वर्षांपूर्वी सोयाबीनसह एकूण तेलबियांचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर होते. त्यात सोयाबीनचा पेरा २ लाख ७५ हजार हेक्टरचा होता. सर्वाधिक सोयाबीन अमरावती जिल्ह्य़ात घेतले जात होते. नंतरच्या काळात सोयाबीनची शेतकरीप्रियता वाढत गेली आणि सोयाबीनचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ११ लाख हेक्टपर्यंत जाऊन पोहोचले. गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या भावातील चढउतार, केसाळ अळीसह रोगांचा प्रादुर्भाव, कमी उत्पादकता यातूनही शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीचा कल कमी झालेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या लागवडीने उच्चांक गाठला आहे. सरासरी लागवडीखालील क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे १४ लाख १५ हजार हेक्टरवर (१२८ टक्के) सोयाबीनची पेरणी झाली आहे. पश्चिम विदर्भात दशकभरापुर्वी तिळाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ३३ हजार हेक्टर होते. यंदा तर केवळ २ हजार ७५४ हेक्टर म्हणजे २९ टक्के क्षेत्रात तिळाचा पेरा झाला आहे. तिळाच्या किमती वाढण्यामागे कमी पेरा हे मुख्य कारण मानले जात आहे. बाजारातून तिळाचे तेलही गायब झाले आहे. तिळाची लागवड केवळ बांधापर्यंत मर्यादित झाली आहे. घरच्या वापरासाठी तीळ लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा हेतू आहे.
उन्हाळी भुईमुगाची लागवड काही भागात वाढली असली, तरी खरिपात गेल्या दशकभरात भुईमूग लागवड झपाटय़ाने कमी झाली आहे. २००२-०३ मध्ये अमरावती विभागात असलेले भुईमुगाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २३ हजारवरून आता फक्त १५०० हेक्टरवर आले आहे.
यंदा खरीप हंगामात १ हजार ७१२  हेक्टरमध्ये भुईमुगाचा पेरा झाला आहे. पश्चिम विदर्भात सूर्यफूल आणि कारळची लागवड कधीकाळी लक्षणीय होती, हा शब्दही आता इतिहासजमा झाला आहे. सुर्यफूलाच्या सरासरी १२ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०६ हेक्टरमध्ये सुर्यफुलाची लागवड झाली आहे. कारळ तर पूर्णपणे हद्दपार झाले आहेत. याशिवाय, इतर तेलबियांचा पेराही घटला आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका मूग आणि उडिदाला बसला आहे. यंदा केवळ ६५ हजार ८७९ हेक्टर म्हणजे ३२ टक्के क्षेत्रात मूग, तर ३२ हजार ४३८ हेक्टरमध्ये उडीद (२९ टक्के) पेरा झाला आहे.
पश्चिम विदर्भात ही दोन मुख्य पिके मानली जातात. मात्र, त्यासाठी पाऊस वेळेवर येणे आवश्यक आहे. यंदा उशिरा पाऊस आल्याने या पिकांचा पेरणीचा हंगाम निघून गेला आणि पेरणीचे क्षेत्र कमालीचे घटले. आता या पिकांवर पावसाच्या अनियमिततेचे संकट आहे. अमरावती विभागात आतापर्यंत ३२१ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ५५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत १४४ टक्के पाऊस झाला होता. यवतमाळ जिल्ह्य़ात ३४ टक्के, बुलढाणा ५२ टक्के, वाशीम ५४ टक्के, अकोला ६३ टक्के, तर अमरावती जिल्ह्य़ात ८० टक्के पावसाची नोंद झाली आहे.