महावितरण कंपनीचे चुकीचे नियोजन आणि हलगर्जीपणामुळे होणाऱ्या वीज गळतीचा भार नागरिकांकडून वसूल केला जात आहे. भारनियमनमुक्त नवी मुंबई अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महावितरणने भारनियमनमुक्त कर नागरिकांकडून वसूल केला आहे. एकंदरीतच वीज गळतीचा भार वाढीव बिलांच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल करणाऱ्या महावितरण कंपनीच्या निषेधार्थ शनिवारी एमआयडीसी  सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
वीज दरात करण्यात आलेली वाढ त्वरित रद्द करून स्थानिक पातळीवरील कामकाजात सुधारणा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.  
या मोच्र्यातील आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. एन. पाटील यांच्याशी चर्चा करून वाढीव बील त्वरित रद्द करणे, ० ते २०० युनिटपर्यंत ३.३६ रुपये दर आकरणी करणे, विद्युत देयके वेळेवर मिळण्यात यावी, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ग्राहकांना त्याची लेखी स्वरूपात पूर्वकल्पना द्यावी आदी मागण्याचे निवेदन पाटिल यांना सपूर्द करण्यात आले.