अतिगोड पदार्थाच्या सेवनाने मधुमेह होतो, अगदी त्याचप्रमाणे शेती विकून अचानक हाती आलेल्या अतिपैशाने भू-मेह होतो. भू-मेहाची समस्या वाढत्या शहरीकरणाच्या समस्येशी संबंधित आहे. शहरालगतच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात गेल्या आणि चांगला मोबदला मिळूनही ज्यांना नियोजन करता आले नाही, त्यांचे कुटुंब मात्र उद्ध्वस्त झाले. औद्योगिकीकरणाच्या रेटय़ाने आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या महत्त्वाकांक्षेतने जमिनीवरच घाला घातला गेल्याने शेतक ऱ्यांच्या जीवनावरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
शेतक ऱ्यांकडे शेतीच्या विक्रीतून अचानक मोठय़ा प्रमाणात पैसा आला तर त्याची कशी वाताहत होते, हे मांडण्याच्या प्रयत्न प्रणय श्रावण पराते यांनी ‘भू-मेह’ या पुस्तकातून केला. त्यातून शेतक ऱ्यांच्या सवेदना त्यांनी मांडल्या आहेत. अल्पभूधारक केवळ शेतीवर अवलंबून राहून भव्यदिव्य स्वप्न साकारू शकत नाही. शेती विकून कोटय़वधी रुपये खिशात येत असतील तर त्याला मोहपाशातून सुटणे शक्यच नाही. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही तर गँगरीन होते आणि शरीराचा भाग कापून फेकावा लागतो, अगदी तसेच विना मेहनतीचा पैसा खिशात आला तर रक्ताचे नातेसंबंध गँगरीन सारखेच पूर्णपणे तोडण्याची वेळ येते, म्हणूनच पुस्तकाला दिलेले भू-मेह असे नाव सार्थ वाटते.
देशात आज कृषीचे महत्त्व टिकवून ठेवण्याची महत्त्वाकांक्षा शेतक ऱ्यांमध्ये उरली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तो दिवसेंदिवस पोळला जात आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. आता प्रत्येक गावात भूमाफियांचे जाळे पसरले आहे.  
एकेकाळी शेतकरी सधन, संपन्न समजला जायचा. शेतकरी अनेकांना रोजगार द्यायचा. त्याची शेती भरभराट आणणारी होती. तोच बळीराजा आज देशोधडीला लागला अन् मजूर बनला आहे. विकासाच्या नावावर जमिनी घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. समाजातील काही राजकीय नेत्यांनी जवळच्या काळ्या पैशाची गुंतवणूक करून आजूबाजूच्या जमिनी विकत घेतल्या. आज तेच कोटय़वधी रुपये कमवित आहेत. बिल्डर लॉबी व लेआऊटचा व्यवसाय करणाऱ्यांनी फार्महाऊसच्या नावाखाली जंगलाचा व जमिनीचा सत्यानाश केला. औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे पिकाखालील क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून शेती करण्यायोग्य जमीन ले-आऊट व गोदामाच्या कामात आली आहे. उद्योगक्षेत्रातील सुलभ रोजगार पद्धतीमुळे शेतातील मजुरांची संख्या कमी झाली आहे. यामुळे नापेर जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. शहरीकरणाचा पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे.  महानगरांच्या विस्तारामुळे शेतीच्या विक्रीतून भरपूर पैसा हाती आलेल्या शेतकरी कुटुंबाच्या शोकांतिका आता सुरू झाल्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबीयांची वाताहात शब्दबद्ध करण्याच्या प्रणय श्रावण पराते यांनी केलेल्या धाडसाला तोड नाही.

‘भू-मेह’ पुस्तकाचे आज प्रकाशन
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आधारित प्रणय श्रावण पराते यांनी लिहिलेल्या ‘भू-मेह’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या ९ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता अ‍ॅग्रोव्हेट- अ‍ॅग्रोइंजि मित्र परिवार व निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, प्रा. शरद पाटील, सेवानिवृत्त अधिकारी धनंजय धार्मिक, कृषिभूषण शिवनाथ बोरसे, सामाजिक कार्यकर्ते बाबा डवरे उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिलीप  शेळके, नागपूर</strong>