बँकांच्या सक्तीच्या वसुलीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. बँकांची वसुली बंद व्हावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत घोषित व्हावी या मागणीसाठी आठ मार्चला जागतिक महिला दिनी शेतकरी विधवा उपोषण करणार असल्याचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. विदर्भात अतिवृष्टीमुळे खरिपाचे १२ लाख हेक्टरमधील पिकांची नासाडी झाली आहे. नव्या उमेदीने आशेचा किरण म्हणून रब्बीचे पीक घेण्यासाठी सावकाराच्या दारोदारी फिरून कर्ज घेऊन पिकाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वादळी पावसाने नुकसान झाल्याने चिंतातूर झाला आहे. गेल्या आठ दिवसाच्या गारपिटीने संपूर्ण तीन लाख हेक्टरमधील हरबरा, तूर व गहू या रब्बी पिकांची संपूर्ण नापिकी झाली आहे. त्याचवेळी बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यातील वाई रुई येथील शेतकरी गजानन जतकर, मारेगाव तालुक्यातील जळका येथील शेतकरी अशोक कोहचाडे तर घाटंजी तालुक्यातील गणेरी येथील शेतकरी नागोराव गेडाम यांच्या आत्महत्यांना आघाडी सरकार जबाबदार असून बँकांची वसुली बंद व्हावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत घोषित व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. घाटंजी तालुक्यातील सावरगावचे शेतकरी गणपतराव कन्नलवार यांनी पाच ते सहा शेतकऱ्यांची तूर घाटंजीला विकून आलेल्या रकमेचा धनादेश पारव्याच्या स्टेट बँकेत जमा केल्यावर व्यवस्थापकाने सर्व रक्कम पीक कर्जात जमा करू अशी माहिती दिल्याने गणपतराव कन्नलवार यांना धक्का दिला. विदर्भात मंत्री येतात. घोषणा करतात. जिल्हाधिकारी आणेवारी काढून घोषणा करतात. मात्र, बँक वसुलीच्या नोटिसा पाठवून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात, याचे उदाहरण जळका येथील शेतकरी अशोक कोहचाडे यांची आत्महत्या आहे. बँकांच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार असून याला आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप तिवारी यांनी केला. कोणत्याही आमदार किंवा खासदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा किंवा दौरे करू देणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे.