04 March 2021

News Flash

पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त

जून संपायला आठ दिवस शिल्लक असताना मान्सून न बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊस कमी पडणार, असा अंदाज यापूर्वी हवामान

| June 25, 2014 08:25 am

पेरण्या लांबल्या, उकाडा वाढला
जून संपायला आठ दिवस शिल्लक असताना मान्सून न बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊस कमी पडणार, असा अंदाज यापूर्वी हवामान खात्याने वर्तविला असला तरी शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून दिवसभर उन्ह आणि सायंकाळी ढगाळ वातावरण यामुळे उकाडा वाढल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जून महिन्यात पाऊस दमदार सुरुवात करीत असताना यावर्षी मात्र तो कुठे दडला? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. १ ते २३ जूनदरम्यान सरासरी १४७ .३३ मिमी पाऊस पडायला हवा होता. मात्र, यावेळी ६४.११ मिमी पाऊस पडला आहे.
 एरवी ७ जूनला विदर्भात मान्सून दाखल होतो. गेल्यावर्षी तो वेळेत दाखल झाला होता. मात्र, यावेळी जून महिना संपत असताना विदर्भात मान्सूनचे दणकेबाज आगमन झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांसोबत पावसाळ्यामध्ये विविध वस्तूंची विक्री करणारे व्यवसायिक चिंतेत आहे. विदर्भात अजूनही कोरडाच असल्यामुळे खरीप हंगामासाठी जमिनीची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात यामुळे आता आसवे येण्याची वेळ आली आहे. विदर्भात नागपूरसह अकराही जिल्ह्य़ांमधील तापमान गेल्या आठवडय़ापासून घसरले असले तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया ही शहरे पुरती भाजून निघाली. चंद्रपूरचे तापमान विक्रमी ४८.२ अंश सेल्सियस तर नागपूरचे ४७. ५ अंशापर्यंत पोहोचल्याने उष्णतेचे उच्चांक नोंदले गेले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक राहिला. त्यामुळे पाऊसही चांगला पडेल, असे भाकित करण्यात आले आहे. परंतु, जून महिना संपत आला तरी पावसाने विदर्भात हजेरी लावलेली नाही.
गेल्या आठवडय़ात चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि बुलढाण्यात मान्सूनपूर्व हलका पाऊस झाला. तेव्हापासून नुसतेच ढगाळी वातावरण आहे. अधूनमधून हलक्या सरी येतात आणि वादळी वारे सुटतात. सध्याची स्थिती मान्सूनला अनुकूल असून आगामी दोन-तीन दिवसात जोराचा पाऊस येण्याची शक्यता असल्याचे विभागीय हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
नागपूर विभागात सर्वसाधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावेळी या काळात केवळ ६४ .४१ मिमी सरासरीच्या ५६.६१ टक्के पाऊस कमी झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ात १३९.७९ मि.मी. पैकी ६९.६४ (सरारसरीच्या ५० टक्के) वर्धा जिल्ह्य़ात १३७ .७३ मि.मी च्या तुलनेत ६०.६६ मि.मी (सरासरीच्या ४४ टक्के), भंडारा जिल्ह्य़ात १४८.४३ मि.मी. त्या तुलनेत ५४.२९ मि.मी. (सरासरीच्या ३७ टक्के), गोंदिया जिल्ह्य़ात १४८.७३ मि.मी. च्या तुलनेत ८९.६३ मि.मी. (सरासरीच्या ५६ टक्के), चंद्रपूर जिल्ह्य़ात १४३ मि.मी.च्या तुलनेत ४७.०१ मि.मी. (सरासरीच्या ३३ टक्के) आणि गडचिरोली जिल्ह्य़ात १५६ मि.मी. च्या तुलनेत ६३.४३ मि.मी. (सरासरीच्या ४१ टक्के) पाऊस झाला आहे.
साधारणत: मुंबईत दणकेबाज पाऊस झाल्यानंतर काही दिवसात विदर्भातही जोरदार पावसाचे आगमन होते. यंदा मराठवाडय़ापर्यंत आलेला मान्सून विदर्भात प्रवेशलेला नाही. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व पावसाने वरवर ओली झालेली जमीन पुन्हा कोरडी झाली आहे. पेरणीसाठी एवढा पाऊस पुरेसा नाही. नांगरणीची कामे आटोपलेली आहेत. राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने अनेक शेतकऱ्यांजवळ बियाण्यांची खरेदी करण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू असली तरी पेरणीच्या कामांना वेग आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 8:25 am

Web Title: farmers in conflict
टॅग : Nagpur News
Next Stories
1 रक्ताचे दर दुप्पटीने वाढले
2 उपराजधानीत कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा
3 महावितरणच्या भरारी पथकाने १० लाखांच्या वीजचोऱ्या पकडल्या
Just Now!
X