तेलही गेले अन् तूपही गेले..हाती आले धुपाटणे..अशी काहीशी अवस्था ठाणे जिल्ह्य़ातील इमू पालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची झाली असून इमूची विक्री होत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. या जोडधंद्यामुळे बँकेकडून कर्जाचे मार्ग बंद झाल्याने त्यांचा मूळ शेतीचा व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे इमू पालनाचा व्यवसाय आता शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर इमू पालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ठाणे जिल्ह्य़ातील सुमारे ७१ शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून इमू पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांना मोठय़ा प्रमाणावर मुदती कर्ज दिले. तसेच या व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शनही केले. त्यानुसार या शेतकऱ्यांनी इमू पालनाचा व्यवसाय सूरू केला. मात्र, बँकेने गृहीत धरलेल्या धोरणानुसार हा व्यवसाय नुकसानीचा ठरू लागला आहे. त्यामुळे इमू पालन व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकित झाले आहे, असे ठाणे जिल्हा इमू फार्मस असोशिएशनचे अध्यक्ष सागर भोईर यांनी म्हटले आहे. इमूची विक्री, त्याचे तेल तसेच अंडी यांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असे खासगी संस्थांकडून सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या संस्थांनी इमू, त्याचे तेल आणि अंडी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यातच एका इमूच्या पालनासाठी प्रतिदिन २५ ते ३० रुपये खर्च येत असून एका फार्ममध्ये साधारणत: ४० ते ५० पक्षी आहेत. त्यामुळे त्यांचा खर्चही आता शेतकऱ्यांना डोईजड होऊ लागला आहे. अशी माहिती विश्वास भोई यांनी दिली.
*  इमूला बाजारात शून्य किंमत असल्याने त्यांची विल्हेवाट लावणे मुश्कील झाले असून हे पक्षी मोकाट सोडून दिल्यास परिसरातील समाजास व शेतीस नुकसानकारक ठरतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण इमू पालन कर्ज माफ करावे आणि इमू पक्ष्यांची विल्हेवाट लावून शेतकऱ्यांना या संकटातून मुक्त करावे, अशा मागणीचे पत्र ठाणे जिल्हा इमू फार्मस असोशिएशनच्या वतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
*  इमू पालन व्यावसायिकांचे कर्ज माफ करण्याचे अधिकार बँकेला नाहीत, ते शासनाला आहेत. मात्र, इमू पालनाच्या व्यवसायामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे इमू पालन व्यवसायासाठी घेतलेले त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, असे विनंती पत्र मुख्यमंत्री तसेच नाबार्ड बँकेला दिल्याचे दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी सांगितले.