पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाच्या जमिनीवरील कबलायतदार, वहीवाटदारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शेतक ऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अखिल भारतीय किसानसभेच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जमीनधारक शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.    
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कागल, गडहिंग्लज, आजरा आदी तालुक्यांतील जमिनी शेतकऱ्यांकडे कसण्यासाठी दिल्या आहेत. त्या शेतक ऱ्यांकडे अदा करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. शेतक ऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवारी जमीनधारक शेतक ऱ्यांनी मोर्चा काढला.    
टाऊन हॉलपासून मोर्चाला सुरुवात झाली. जमीनधारक शेतकरी समितीचे अध्यक्ष कॉ.संतराम पाटील, मार्गदर्शक कॉ.चंद्रकांत यादव, अण्णा शिंदे, बाबुराव अवघडे, प्रकाश कांबळे, अनंत चौगुले, एन.वाय.जाधव, हरीशचंद्र हेर्डेकर, शब्बीर कलावंत, वसंत सिंघण, तुळसाराम पाटील, अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.     
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर शेतक ऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जमीनधारक शेतक ऱ्यांच्या स्थानिक प्रश्नाबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.