शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतूच्या उभारणीसाठी उरण परिसरातील जासई, गव्हाण, चिर्ले आदी परिसरातील जमिनी संपादित करण्यात येणार असून या जमिनींच्या संपादनापूर्वी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी उरण येथील मेट्रो सेंटर कार्यालयात बैठक बोलाविण्यात आलेली होती. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात विचारणा केली असता मेट्रो सेंटरच्या विशेष भूसंपादन अधिकारी गायकर यांनी शुक्रवारी, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता सिडको कार्यालयात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना केलेली आहे. या बैठकीत सिडकोकडून पॅकेजसंदर्भात चर्चा करून माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.
मुंबईतील शिवडी ते उरण असा प्रस्ताव असलेल्या या पुलासाठी उरण व पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्याही जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी भूसंपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर पुनर्वसन व मोबदला मिळावा तसेच योग्य पुनर्वसन करण्यात यावे, उद्योग-व्यवसायात स्थान मिळावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जासई येथील शेतकरी संषर्घ समितीचे नेते सुरेश पाटील यांनी दिली आहे. सिडको कार्यालयातील बैठकीसाठी मोठय़ा संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आलेले आहे.