30 May 2020

News Flash

शेतकरी आंदोलनाच्या स्मृती जतन होणार

शेतकऱ्यांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ व १७ जानेवारी १९८४ ला झालेल्या उरणच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी आंदोलनाला ३१ र्वष पूर्ण झाली.

| August 28, 2015 02:08 am

शेतकऱ्यांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १६ व १७ जानेवारी १९८४ ला  झालेल्या उरणच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी आंदोलनाला ३१ र्वष पूर्ण झाली. या आंदोलनाची स्मृती जतन करण्यासाठी  सिडकोच्या आराखडा विभागाने भव्य व सर्व सुविधांनी सज्ज असे हुतात्मा भवन जासई येथे उभारण्याचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे.
नवी मुंबई प्रकल्पाच्या उभारणीसाठी उरण, पनवेल तसेच ठाणे जिल्ह्य़ातील बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांची राहती घरे सोडून संपूर्ण जमिनी संपादित केल्या. या जमिनींचा ताबा घेण्याचा प्रयत्न १९८४ साली सरकारने केला होता.
या विरोधात शेतकऱ्यांचे नेते दिवंगत माजी खासदार दि.बा.पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात १६ जानेवारीला दास्तानफाटा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चिर्ले येथील नामदेव घरत तर धुतूममधील रघुनाथ ठाकूर या दोन शेतकऱ्यांनी बलिदान दिले. दास्तान येथील गोळीबारानंतर हे आंदोलन तीव्र होत गेले.
त्यानंतर नवघर फाटा येथे शेतकऱ्यांनी संघटित होऊन शासनाचा निषेध केला यावेळी झालेल्या गोळीबारात पागोटे गावातील पिता-पुत्र महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल या तीन शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले. शेवटी सरकारने दि.बा. सोबत चर्चा करून २७ हजार रुपये एकरी मोबदला तसेच साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे मान्य केले.
या आंदोलनाला देशभरातील शेतकरी तसेच कामगारांनी पािठबा दिला होता. या शौर्यशाली व गौरवशाली आंदोलनातील हुतात्म्यांचे जासई येथे स्मारक आहे. ते ग्रामस्थांनी बांधलेले आहे.
मात्र शेतकरी आंदोलन व त्यातील हुतात्मे व नेते यांचे स्मरण रहावे याकरिता त्यांचे हुतात्मा भवन उभारण्याची मागणी करण्यात आली होती. याकामी माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
सिडकोने जासई येथे हुतात्मा भवन उभारण्यासाठी आराखडा तयार केला असल्याची माहिती जासई ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता हुतात्मा भवनाचा आराखडा प्रस्तावित असला तरी जाहीर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 2:08 am

Web Title: farmers movement under the leadership of the late leader db patil completed 31 years
टॅग Farmers
Next Stories
1 आजच्या सर्वसाधारण सभेत एनएमएमटी बससेवेचा निकाल
2 अश्लील संदेश पाठविणारा पोलिसांच्या जाळय़ात
3 गणेशोत्सवानिमित्त उरणमधून एस.टी.च्या जादा बसेस
Just Now!
X