केंद्र सरकारने आणणलेल्या अन्न सुरक्षा विधेयकामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर त्याला विरोध करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रवी देवांग यांनी केले.
शेतकरी संघटनेचे नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूरला अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीच्यावेळी ते बोलत होते. बैठकीला राम नेवले, संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्ष शैलजा देशपांडे धर्मराज रेवतकर, अरूण केदार आदी पदाधिकारी उपस्थित होते  
आगामी लोकसभा निवडणुका केंद्र केंद्र सरकार अन्न सुरक्षा विधेयक आणत असल्यामुळे शेतक ऱ्यांचे त्यात नुकसान होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात येणार असून शेती आणि उद्योगातील उत्पादकता कमी होणार आहे. पर्यायाने देशाता विकास थांबेल. देशातील गोरगरीबाचे मत मिळविण्यासाठी काँग्रेसेची ही खेळी असून शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करून या विधेयकाला विरोध करावा असे आवाहन देवांग यांनी केले.
राम नेवले म्हणाले, अन्न सुरक्षा विधेयक आणून सरकार गरिबांना पुन्हा पुन्हा गरीब करून त्यांना लाचार करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग बंद करणार असून हे विधेयक म्हणजे मते मिळविण्यासाठी घाईघाईने टाकलेला हा डाव आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांनी त्याला विरोध करावा. शैलजा देशपांडे म्हणाल्या, केंद्र सरकारने गेल्यावर्षी ३६०० रुपये कापसाच्या आधारभूत किंमतीत फक्त १०० रुपये वाढ करून केवळ ३७०० रुपये किंमत जाहीर केली. त्याचा निषेध करून विदर्भ आणि मराठवाडय़ात २ ऑक्टोबरला कापूस परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आव्हान केले.
चंद्रपूरला होणाऱ्या संघटनेच्या अधिवेशनात देशाची आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांसाठी येणारा पुन्हा सिलिंगचा कायदा, शेतीमालाचे पडलेले भाव, ग्रामीण भागातून शहराकडे जाणारा जनतेचा लोंेढा थांबविण्यासाठी उपाययोजना या विषयावर निर्णय घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात देशभरातील विविध राज्यातील शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती अरुण केदार यांनी दिली. बैठकीला मदन कामडे, नारायण बांदरे, वसंतराव वैद्य, नथुराव निमकर, प्रभाकर माळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.