गेल्या पंधरवडय़ापासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्य़ात ओला दुष्काळाचे सावट झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टीमुळे दुबार, तिबार पेरणी करूनही खरीप हंगाम वाया जात असल्याचे बघून पाऊस थांबविण्यासाठी व धानउत्पादक शेतकऱ्यांनी शासनाने सापत्न धोरण बदलावे, यासाठी शासनाला सदबुद्धी मिळो, यासाठी आता शेतकऱ्यांनी चक्क देवाकडे साकडे घालण्याची वेळ आली आहे. गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थानात शेतकऱ्यांनी यज्ञ केला.
शेतकऱ्यांच्या या साकडय़ाला मांडोदेवी किती दाद देते, हा जरी येणारा काळ सांगणार असला तरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, हे मात्र निश्चित. यंदा जिल्ह्य़ात पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहे. पावसाळ्याच्या मध्यंतरातच पावसाने सरासरीचा उच्चांक गाठला आहे. याचा दुष्परिणाम जिल्ह्य़ातील जनजीवनावर पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली; परंतु वरुणराजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे हे प्रयत्न ही अपयशी ठरले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगाम वाया जाणार व ओल्या दुष्काळामुळे आपली व आपल्या कुटुंबाची जीविका कशी चालणार, असा प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. परंतु, पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी चक्क देवांकडे धाव घातली असल्याचे दिसत आहे. मांडोदेवी देवस्थानात भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी पाऊस थांबावा व शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी यज्ञ केला.
इतकेच नव्हे, तर १ ऑगस्टला जिल्ह्य़ातील ओल्या दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी धान उत्पादक शेतकऱ्यांबद्दल प्रती हेक्टर ७ हजार ५०० रुपये मदत जाहीर केली ती अपुरी असून शासन धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे शासनाला धान उत्पादक शेतकऱ्यांविषयीचे सापत्न धोरण बदलविण्याविषयी सबुद्धी मिळो, अशी प्रार्थनाही या शेतकऱ्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना मांडादेवी ही जागृत देवस्थान असल्याने देवी नक्कीच कृपा करेल, अशी आशा बोलून दाखविली. अनेकदा पाऊस येण्यासाठी देवाला केलेली याचना जिल्ह्य़ासह परिसरात चच्रेला विषय ठरत आहे.