शारंगधर फाउंडेशनतर्फे पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे नुकतेच एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पिकांच्या उत्पादनात अडकलेल्या शेतकऱ्यांना आयुर्वेदिक औषधांसाठी आवश्यक असलेल्या वनस्पतींच्या उत्पादनांकडे वळविणे आणि त्यांना आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग दाखविणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. डॉ. शैलेश गुजर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शारंगधर फार्माचे संचालक डॉ. जयंत अभ्यंकर, कार्यकारी संचालक किरण अभ्यंकर, अगस्ती फार्माचे संचालक डॉ. अरविंद कडूस, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुगंधी व औषधी वनस्पती विषयाचे प्राध्यापक डॉ. शशिकांत चौधरी या वेळी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गुजर म्हणाले, शेतकरी व आयुर्वेद ही संकल्पना भारतीय पुराणकाळातील ग्रंथात आढळून येते. मात्र औषधी वनस्पतींची लागवड देशात मोठय़ा प्रमाणात दिसून येत नाही. शेती, शेतकरी आणि आरोग्य यांचे समीकरण यातून साधले जाईल.
मेळाव्यातील उपस्थित शेतकऱ्यांना अश्वगंधा, शतावरी, सर्पगंधा आदी वनस्पतींच्या लागवडीची माहिती देण्यात आली. डॉ. जयंत अभ्यंकर यांनी मेळाव्यामागील उद्देश व फाऊंडेशनचे कार्य याची माहिती दिली. डॉ. कडूस यांनी स्लाइड-शोद्वारे औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबतचे अनुभव मांडले, तर डॉ. चौधरी यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड, विद्यापीठाकडून मिळणारी मदत, विविध शासकीय योजना याबाबत माहिती दिली.