ज्या परिसरात द्राक्षबागा, ऊसशेती व बीटी कॉटन अधिक प्रमाणात घेतले जाते, त्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या पीकपद्धतीमुळेच दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे दर्शक स्वामी यांनी व्यक्त केले.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने जिल्हय़ात जलजागृती व जलसंवर्धनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. बंगळुरू येथील शांताराम शेणई, नितीन भोसले या वेळी उपस्थिती होते. गेल्या दहा वर्षांत पाण्यासाठी सरकारने एक लाख कोटी रुपये खर्च करुनही हाताशी काहीच आले नाही.  दुष्काळ निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना आखायला हव्यात, असे दर्शक स्वामी यांनी सांगितले. नितीन भोसले यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.  उपाययोजनेंतर्गत टँकरने पाणीपुरवठा, पाणपोई उभारणी, वन्य प्राण्यांसाठी पाणवठय़ांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण,  आदी कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली.