28 September 2020

News Flash

कर्ज वसुलीवरून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेत ठिय्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

बडय़ा थकबाकीदारांकडे कानाडोळा करत जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीसाठी सर्वसामान्यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बँक प्रशासकांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या मारून गोंधळ

| June 27, 2013 05:11 am

बडय़ा थकबाकीदारांकडे कानाडोळा करत जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीसाठी सर्वसामान्यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बँक प्रशासकांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या मारून गोंधळ घातला. बँकेचे अधिकारी अर्वाच्च भाषा वापरून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली. जुलमी पद्धतीने सुरू असलेली ही वसुलीची पद्धत त्वरित न थांबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या ज्ञानेश्वर मुकणे यांनी थकीत कर्ज वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याकरिता त्यांनी बडय़ा १०० कर्जदारांची नांवे प्रसिद्ध करण्याचा इशारा दिला होता. तथापि, ही मोठी थकीत रक्कम वसुल करण्याऐवजी बँकेने सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न पंधरा दिवसांपासून चालविला असल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक पगार यांनी केली. पगार यांच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० शेतकऱ्यांनी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर सहकार विभागाकडे तक्रार करून हे शेतकरी द्वारका येथील बँकेच्या मुख्यालयात धडकले. प्रशासक कार्यालयात नसल्याचे समजल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी तेथे ठिय्या मारून बँक अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा निषेध केला. एक ते दीड लाख रूपयांपर्यंत कर्ज घेणारे शेतकरी दर महिन्याच्या ३० तारखेपूर्वी हप्ते भरतात. परंतु, बँकेचे अधिकारी ही बाब विचारात न घेता सरसकट सर्वाच्या पाठीमागे लागले आहे.
कर्ज वसुलीसाठी येताना त्यांच्यामार्फत अर्वाच्च भाषा वापरली जाते, असा आरोप पगार यांनी केला. जिल्हा बँकेत गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झाले. बडय़ा थकबाकीदारांकडे मोठय़ा प्रमाणात बँकेची रक्कम अडकली आहे. ही रक्कम वसुल करण्याकडे दुर्लक्ष करत प्रशासकांनी सामान्य शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविल्याचे पगार यांनी सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अयोग्य पद्धतीने चाललेली ही वसुली त्वरित बंद करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी दालनात गोंधळ घातला. काही अधिकाऱ्यांनी यावेळी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आंदोलकांनी धारेवर धरले. प्रशासक येईपर्यंत शेतकऱ्यांनी दालनात न हटण्याचा पवित्रा स्वीकारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 5:11 am

Web Title: farmers stages demonstration at district bank
टॅग Farmers Agitation
Next Stories
1 ‘शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये’
2 ‘भटक्या-विमुक्त समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष’
3 रिक्षाचालकाचा मुलगा होणार सैन्यदलात ‘लेफ्टनंट’
Just Now!
X