तालुक्यातील मुकणे धरणाचे पाणी नाशिक शहराला देण्यास धरण परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हे पाणी नाशिकला दिल्यास त्याबदल्यात नाशिक महानगरपालिकेत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी गुरूवारी घोटी येथे जय किसान फोरमच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली.
तालुक्यातील वैतरणा, वाकी खापरी, मुकणे, भावली या धरणांसाठी संपादित अतिरिक्त जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात, कायमस्वरुपी पाण्याची परवानगी विनाअट द्यावी, शेतकऱ्यांच्या भात पिकाला शासनाने हमी भाव द्यावा, तालुक्यातील कारखान्यांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या द्याव्यात, प्रकल्प ग्रस्तांना २० टक्के आरक्षण द्यावे, वाकी खापरी धरणग्रस्तांचे प्रथम पुनर्वसन करावे. तोपर्यंत धरण व रस्त्याचे काम करू नये तसेच मुकणे धरणाचे पाणी
नाशिकला देऊ नये. दिल्यास महानगर
पालिकेत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे आदी मागण्या जय किसान फोरमने मांडल्या आहेत. या मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली वैतरणा फाटय़ाजवळ दुपारी कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या दिला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
तहसीलदार महेंद्र पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांसंदर्भात वरिष्ठांना कळवून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात धुमाळ यांच्यासह किसन शिंदे, देवराम मराडे, ज्ञानेश्वर गटकळ आदिंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी
झाले होते.