पवनचक्की उभारणीसाठीची नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणामुळे निराश झालेल्या शेतक ऱ्याने पवनचक्कीच्या २५ फुटांवरील टॉवरला गळफास लावून आत्महत्या केली. भीमराव सुखदेव नलवडे (वय ५०) असे या शेतक ऱ्याचे नाव आहे. ही घटना समजल्यावर सांगली जिल्ह्य़ातील वायफळे (ता.तासगाव) येथे या शेतकऱ्याचे कुटुंबीय नातेवाईक व ग्रामस्थांनी शनिवारी रात्रभर नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. तरीही कंपनीचे कोणीही अधिकारी गावाकडे न फिरकल्याने अपेक्षाभंग झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी २० तासांनंतर अंत्यविधी केला.     
तासगाव तालुक्यातील वायफळे परिसरात सुझलॉन कंपनीने सुमारे ३४ पवनचक्क्य़ा उभ्या केल्या आहेत. त्यासाठी कंपनीने शेतक ऱ्यांकडून जागा ताब्यात घेतल्या आहेत. भीमराव नलवडे यांच्या शेतजमिनीतही टॉवर उभा करण्यात आला होता. सुझलॉन कंपनीने जमिनीचा मोबदला अदा केलेला नव्हता. त्यासाठी नलवडे सातत्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होते. पण त्याला दाद मिळत नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या नलवडे यांनी शनिवारी सायंकाळी शेतातील टॉवरच्या २५ फुटांवर असलेल्या संचाला गळफास लावून आत्महत्या केली.     
ही माहिती समजल्यानंतर घटनास्थळी कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ एकत्र जमले. नातेवाईक व ग्रामस्थांनी नलवडे यांची नुकसान भरपाई मिळत नाही तोवर शव उतरविले जाणार नाही, असा निर्धार केला. रात्रभर याच मागणीसाठी सर्व जण शेतातच थांबून राहिले होते. सुझलॉन कंपनीच्या अन्यायी व दडपशाही भूमिकेविरुद्ध घोषणाबाजी केली जात होती.
सुमारे २० तास आंदोलन करूनही आंदोलनस्थळी वा गावात कंपनीचे कोणी अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या नातेवाइकांनी तासगाव पोलीस ठाण्यात सुझलॉन कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर नलवडे यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला.